आम्हाला पण तोंड दिलय, गप्प नाही बसणार, तुमचे आजोबा… माजी आमदाराचा रोहित पवारांना इशारा
GH News August 02, 2025 12:09 PM

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. “रोहित पवारांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये आधी माहिती घ्यावी. तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता, पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला” असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला. “आमची जहागिरी पाहण्यापेक्षा तुमचे आजोबा काय करत होते? तुमच्याकडे एवढे गबाळ कुठून आले? तुम्हाला ईडीच्या नोटीस का आल्या?” असे प्रश्न राजेंद्र राऊत यांनी विचारले आहेत. बार्शीतील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी जळल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवारांवर बोचरी टीका केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. “त्यांच्या आजोबांनी देशाचे राजकारण केले, ते कशा पद्धतीने केलं याची माहिती घेऊन त्याचा अभ्यास रोहित पवारांनी करावा. चुकीच्या माहितीच्या आधारे बेछुट आरोप करू नये, कारण प्रत्येकाचे भवितव्य असते” असं उत्तर राजेंद्र राऊत यांनी दिलय.

‘बार्शीतील 35 टक्के जमीन राऊत कुटुंबाची होती’

“माझा मुलगा रणवीर याचा या घटनेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. या पूर्वी रणवीरकडून जी शिवीगाळ झाली होती, त्याचे कारण त्या मुलाने एका महिलेची छेड काढली होती” असं आरोपाला उत्तर देताना राजेंद्र राऊत म्हणाले. “बार्शीतील 35 टक्के जमीन आमच्या राऊत कुटुंबाची होती. कारण शिवरायांच्या काळात आम्हाला ती दिली होती. आमचे राऊत कुटुंब हे शिवरायांच्या सैन्यात घोडेस्वार होते” असं राजेंद्र राऊत म्हणाले.

‘आम्हाला पण तोंड दिलय’

“आमची जहागिरी पाहण्यापेक्षा तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते? तुमच्याकडे एवढे गबाळ कुठून आले? तुम्हाला ईडीच्यादोन दोन नोटीस का आल्या? एवढ्या कारखान्याच्या भानगडी केल्या त्याचे आधी उत्तर द्या” अशी टीका राजेंद्र राऊत यांनी केली. “खोटे आरोप केल्यास आम्हांला पण तोंड दिलय, आम्ही गुपचूप बसणारी माणसं नाहीत” असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.