आळंदी रस्त्यावरील वाहतूक अतिक्रमणांच्या 'जाळ्यात'
esakal August 02, 2025 09:45 PM

भोसरी, ता. २ ः आळंदी रस्त्यावरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनेही लावली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. पादचाऱ्यांनाही धोका पत्करून मुख्य रस्त्याने चालावे लागते. रस्त्यावर रोजच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. त्यामुळे या रस्त्यावर खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. हा रस्ता दुपदरी आहे. भोसरीवरून आळंदी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, विश्रांतवाडी, पुणे, लोहगड विमानतळ आदी भागांकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे.
रस्त्याच्याकडेला फळ विक्रेते, विविध खाद्य पदार्थ विक्रेते, कपडे विक्रेते आदींसह विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. या रस्त्यावरील मंगल कार्यालयात कार्यक्रमासाठी येणारे पाहुणे रस्त्याच्या कडेलाच अस्ताव्यस्त वाहने लावतात. त्यामुळे या रस्त्यावर भोसरी-आळंदी रस्ता चौक ते बनाच्या ओढ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते.


कोंडीची प्रमुख कारणे
- भोसरी एमआयडीसीमध्ये कच्चा व तयार मालवाहू अवजड वाहनांची रहदारी
- आळंदी, दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी, बोपखेल आदी भागांतील विद्यार्थी भोसरीतील विविध शाळांमध्ये शिक्षणासाठी खासगी बसद्वारे येतात
- आळंदी रस्त्यावरील शाळेच्या बसच्या फेऱ्यांतही वाढ
- भोसरी-आळंदी रस्ता चौक, शास्त्री चौक, बनाचा ओढा, कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यान, मॅगझीन चौक आदी भागांमध्ये दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर बस थांबे
- भोसरी एमआयडीसीत भोसरी पंचक्रोशीतून येणाऱ्या कामगारांचीही संख्या मोठी
- कंपन्यांच्या खासगी बसद्वारे कामगारांची आळंदी रस्त्याने ये-जा
- विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी
- मंगल कार्यालयातील पाहुण्यांची वाहने बेशिस्तपणे उभी

सम-विषम पार्किंग नावाला
काही वर्षांपूर्वी भोसरीतील आळंदी रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने तसे फलकही लावले होते. मात्र, या रस्त्यावर एकदाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. या रस्त्यावर दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी वाहने लावली जातात.

वाहनतळ अद्यापही बंदच
आळंदी रस्त्यावरील तीन मजली वाहन तळाचे उद्घाटन १६ जूनला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, अद्यापही वाहनतळ नागरिकांसाठी सुरू झालेला नाही. या वाहनतळाचा ताबा अद्याप मिळाला नसल्याचे भूमी जिंदगी विभागाचे म्हणणे आहे. या विषयी महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

भोसरीतील आळंदी रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीत अडकल्यावर वाहन चालकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
- राघव वाकोडे, वाहन चालक

भोसरीतील आळंदी रस्त्यावर विविध वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन करता येत नाही. त्याचप्रमाणे येथील वाहन तळ सुरू झाल्यावर रस्त्यावरील पार्किंगचे नियोजन अधिक सुलभ करण्यात येईल.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग

आळंदी रस्त्यावरील वाहनतळाच्या काही कागदपत्रांची पूर्तता संबंधित विभागाद्वारे झालेली नाही. त्यामुळे वाहन तळाचा ताबा अद्यापही भूमीजिंदगी विभागाला मिळालेला नाही. ताबा मिळाल्यावर हे वाहन तळ वाहन चालकांसाठी सुपूर्द करण्यात येईल.
- सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, पिंपरी चिंचवड
महापालिका


काय करता येईल ?
- रस्त्यावरील विविध वस्तू विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे
- वाहनतळ तातडीने सुरू करून आळंदी रस्ता ‘नो पार्किंग झोन’ घोषित करणे
- अवजड वाहनांना दिवसा बंदी घालून ती चऱ्होलीमार्गे स्पाईन रस्ता मार्गे वळविणे
- मंगल कार्यालयातील कार्यक्रमाच्यावेळी येणारी वाहने मुख्य रस्त्यापासून दूर लावणे
- रस्त्यावरील शाळा सुटण्याच्या-भरण्याच्या वेळेचे नियोजन करणे
- विद्यार्थी बसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष देणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.