वडगाव मावळ, ता. २ : महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुका महसूल विभागाच्या वतीने महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आपत्ती काळात विशेष सहकार्य करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा प्रशस्ती पत्रके देऊन सन्मान करण्यात आला.
महसूल विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्टदरम्यान मावळ तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले असून, या सप्ताहाचा शुभारंभ शुक्रवारी भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित सन्मान सोहळ्याने झाला. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे, भूमिअभिलेख उपअधीक्षक पल्लवी पिंगळे, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, कोषागार अधिकारी अर्चना शेवते आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग, पोलिस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी नवले यांनी यावेळी रिंगरोड भूसंपादन करताना केलेल्या कामाचा, फेरफार मंजुरी, इतर हक्कांमध्ये केलेल्या सुधारणांची माहिती दिली. महसूल विभागाच्या तालुक्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले व येणाऱ्या काळात महसूल विभागासमोरील असलेली आव्हाने व कामकाजाची दिशा याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मागील वर्षात महसूल विभागाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. पीएम जनमन मध्ये कातकरी समाजाच्या नागरिकांना घरांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. प्रांत व तहसीलदार यांच्याकडील दाखल प्रकरणातील जवळपास पाच हजार निकाल देऊन वेबसाइट वर अपलोड केल्याचे सांगितले. तसेच महसूल सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी नीलेश अवसरमोल, शिवाजी जाधव, तलाठी कविता मोहमारे, प्रतिमा वाघोले, विजय चव्हाण, सचिन जाधव, बाळू जाधव, कोतवाल सोमनाथ कालेकर, सागर जाधव, बाबाजी असवले, मधुकर गायकवाड, दत्तात्रय खोल्लम, महसूल सहाय्यक मीनल जंगम, विकास गेजगे, संदीप तानपुरे, कांताराम ढोरे, हरीश जानेरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आपत्ती काळात केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस पाटील, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव संस्था, पार्डे रेस्क्यू टीम, महाड यांचाही सन्मान करण्यात आला. विशेषतः कुंडमळा येथील दुर्घटनेत रेस्क्यूसाठी मदत करणाऱ्या स्थानिक आपदा मित्र यांचा सन्मान करण्यात आला. महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.