अनोखे सहजीवन
esakal August 03, 2025 03:45 PM

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

पुण्यात जेव्हा जेव्हा सेवासदन शाळेवरून जाणं होतं, तेव्हा तेव्हा रमाबाई रानडे यांची आठवण येतेच. माझ्या आजीची ही शाळा. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याबद्दल समजलं ते तिच्याकडूनच. पुढे ‘उंच माझा झोका’ मालिका तर आलीच, त्याचबरोबर ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे त्यांचं आत्मचरित्रही वाचलं, ते त्यांच्या चरित्राचं लेखन आणि विविध शाळांमधील सादरीकरणाच्या निमित्ताने. या प्रवासात मनावर विशेष कोरलं गेलं ते रमाबाई आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं सहजीवन.

म्हणजे न्यायमूर्तींच्या पश्चातदेखील रमाबाईंनी अत्यंत भरीव कार्य केलंच; पण मुळात अगदी अक्षरओळख करून देण्यापासून रमाबाईंचं व्यक्तिमत्त्व घडवलं ते न्यायमूर्तींनी. आडात असेल तरंच पोहऱ्यात येईल; पण ते ओळखणंही तेवढंच महत्त्वाचं. आपल्याला रमाबाईंच्या रूपाने एक हिरा गवसला आहे, अशी पारख करून पैलू पाडले ते माधवरावांनी. त्यांना घरी माधव म्हणून संबोधलं जायचं. एकूणच आयुष्यात संगतीचं खूप महत्त्व आहे. आपणही ऐकलं असेल, की एक पाण्याचा थेंब चिखलात पडला, तर तो व्यर्थ होतो. तोच पानावर मोत्यासारखा चमकतो; पण शिंपल्यात स्वाती नक्षत्रावर त्याचा खरोखरी मोती होतो. योग्य वेळी, योग्य स्थळी असणं यावर ठरतं आयुष्याची माती होणार की त्याचा मोती होणार. जोडीदाराचं स्थान तर फार महत्त्वाचं असतं आणि रमाबाईंच्या काळात तर त्यांचा भाग्ययोगच म्हणायला हवा. कारण रमाबाईंच्या बालवयात झालेला तो विवाह आणि अर्थातच मुलींना निर्णय स्वातंत्र्य नसण्याचा तो काळ. वय लहान म्हटल्यावर समजही नाही. त्यामुळेच एखाद्या बुरसटलेल्या व्यक्तीशी विवाह झाला असता, तर या रत्नाचं तेज असं चहुदिशांना पसरलंच नसतं; पण न्यायमूर्तींशी विवाह झाला आणि त्यांनी एक मूर्तीच अशी काही घडवली, जिच्या कार्यकर्तृत्वाची कीर्ती आजही कायम आहे आणि हे केवळ त्यांचच नव्हे, तर रमाबाईंच्या कार्याने ज्यांचा ज्यांचा उद्धार झाला अशा सर्वच स्त्रियांचं हे भाग्य म्हणायला हवं.

विवाह झाला, तेव्हा मातीचा गोळा असावा इतक्या रमाबाई लहान. साधी अक्षरओळखही नाही. माहेरी पोथी पुराणांचं श्रवण आणि संस्कारक्षम वातावरणाची पुंजी तेवढी होती; मात्र अक्षरओळख करून देण्यापासून ते व्यवहारज्ञान आणि माणूस म्हणून वर्तन ते अगदी समाजकार्य असा सगळा आकार दिला, तो न्यायमूर्तींनीच. लहान लहान प्रसंगातून रमाबाईंची दृष्टी तर बदललीच; पण आपल्यालाही प्रेरणा ही मिळतेच.

खरंतर सासरच्या घरातील वातावरण हे काही रमाबाईंच्या शिक्षणासाठी पूर्णपणे अनुकूल नव्हतं. त्या काळानुरूप स्वाभाविक होतं ते; पण माधवरावांच्या सांगण्यानुसार घरातील मोठ्या बायकांची बोलणी सहन करत, उलट न बोलताही आपला अभ्यास करत राहायला रमाबाई शिकल्या. नाशिकला बदली झाल्यावर रमाबाई जमाखर्च ठेवू लागल्या, सगळा स्वयंपाक करू लागल्या, अभ्यासाचा वेग तर वाढलाच आणि समाजकार्यातही सहभागी होऊ लागल्या. इथे त्यांच्या विचारांच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या. नाशिक, धुळे, मुंबई अशी भ्रमंती करतानाच रमाबाईंनी आपलं पहिलं भाषणही केलं. भाषण लिहिण्यापासून धाडसाने बोलण्यापर्यंतची तयारी झाली ती माधवरावांमुळेच. तासगावचं हे भाषण म्हणजे मला स्त्रीशिक्षणाबद्दलचा संतुलित विचार वाटतो. जो आजही उपयुक्त आहे. एकदा कलकत्त्यातील मुक्कामी पोहोचल्यावर त्यांना राहण्यासाठी मिळालेली जागा ही रमाबाईंना फारशी पसंत नव्हती. जुनाट वाडा होता. त्यात बागबगिचाही नव्हता. त्यामुळेच दुसरी जागा पाहू, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर माधवरावांनी समजावलं, की काय नाही हे पाहण्यापेक्षा माणसाने आहे त्यात समाधान मानावं.

वाचनासारखं आनंद व समाधान देणारं दुसरं खरोखरी काही नाही. एका पुस्तकाचा कंटाळा आला, तर दुसरं हाती घेता येतं. अगदीच बगिच्यातच फिरायचे असेल, तर गाडीतून निसर्ग पाहायला खुशाल जावं आणि शिवाय बाग नाहीच म्हटल्यावर हवी तशी बाग फुलवण्याची संधी मिळत आहे, हेदेखील ध्यानात घ्यावं. संध्याकाळचं वाचनदेखील आपल्याला याच बागेत करता येईल. खरोखर, माधवरावांचा हा सकारात्मक दृष्टिकोन खरंच किती मोलाचा आहे. प्रत्येक गोष्टीतून चांगलं कसं वेचायचं हे त्यांनी रमाबाईंना दाखवलं आणि त्यांनीही मनापासून ते स्वीकारलं हे विशेष! रमाबाईंचं व्यक्तिमत्त्व एखाद्या बागेसारखंच बहरत होतं आणि खरोखरीच माधवरावांच्या सांगण्यानुसार रमाबाईंनी तशी बाग तयारही केली.

याच बागेत एकदा दोघांचे वाचन चालू असताना एक व्यक्ती आली आणि ‘बंगाली वृत्तपत्र सुरू करायचे आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर माधवरावांनी संमती देताच रमाबाईंना साहजिकच आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं, की ते वृत्तपत्र लावून आपण काय करणार? त्यावर त्यांना माधवरावांनी उत्तर दिलं, की ‘ज्या ठिकाणी काही महिने राहायचे आहे, तेथील भाषा न येणं ही शरमेची गोष्ट आहे.’ माधवरावांना बंगाली भाषेची तोंडओळख आहे हे रमाबाई जाणून होत्या; पण त्यांना नवीन भाषा शिकण्याचा उत्साह वाटत नव्हता आणि माधवराव व्यग्र असतात हे माहीत असल्याने त्या म्हणाल्या, ‘शिकेन तर तुमच्याकडूनच!’ आणि काय आश्चर्य! खंड पडल्याने माधवरावांनी पुस्तकं आणून स्वतःही बंगाली भाषेचा सराव केला आणि वेळात वेळ काढून रमाबाईंचीही शिकवणी घेतली. तल्लख बुद्धीच्या रमाबाई जेमतेम दीड महिन्यात बंगाली लिहू आणि वाचू लागल्या. इच्छा तेथे मार्ग म्हणतात तो असा!

माधवरावांमुळे रमाबाई अशा घडत होत्या; पण एकदा रमाबाईंसाठी घडवलेला छंदच हरवला. छंद म्हणजे हातात घालण्याचा एक दागिना. रमाबाई कोरेगावच्या वाटेवर फिरत असताना त्यांना कैऱ्या पाडण्याचा मोह झाला आणि त्यासाठी त्यांनी कोचमनकडून चाबूक घेतला. कैऱ्या पडतही होत्या; पण एकदा तो चाबूक हातातील छंदात अडकला आणि चाबकाच्या जोराने तो छंद दूर उडाला आणि किती शोधला, तरी सापडलाच नाही. अस्सल सोन्याचा तो छंद त्या वेळी पंच्याहत्तर रुपयांचा होता आणि त्यावेळेस सोने साधारण दहा रुपये तोळा मिळायचे. एवढी मौल्यवान वस्तू आणि आपण ती हरवली! रमाबाई दुःखी झाल्या आणि घाबरल्याही. घरी आल्यावर त्यांनी धीर एकवटून ही गोष्ट माधवरावांना सांगितली.

त्यावर माधवराव म्हणाले, ‘‘तू लोकांच्या झाडाच्या कैऱ्या न विचारता घेतल्यास त्याचीच ही शिक्षा! आता मी छंद शोधणारही नाही आणि नवाही करणार नाही. म्हणजे तुला कायम आठवण राहील.’’ कधी कधी आपल्या माणसाच्या रागावण्यापेक्षा शांत राहाणं अधिक लागतं तसंच रमाबाईंचं झालं. त्यांची अस्वस्थता जाणून पुढे माधवराव म्हणाले, ‘‘वस्तू हरवणे म्हणजे बेसावध राहणे. आज माझीही तपकिरीची डबी हरवली. पुढे काळजी घेतली म्हणजे झाले. त्यासाठी दिवसभर दुःखी राहण्याचं कारण नाही.’’ थोडक्यात, छंद हरवला; पण धडा मिळाला, अनुभव मिळाला. या दोघांच्या वयात साधारण वीस वर्षांचे अंतर. आज पती-पत्नीच्या वयात एवढं अंतर नसतं, तरीही रानडे दाम्पत्याचे हे प्रगल्भ आणि डोळस सहजीवन आजही खूप काही शिकवून जातं.

खरंच सोन्याचा एक छंद हरवला खरा; पण न्यायमूर्तींनी दिलेला समाजकार्याचा सोन्यासारखा वसा मात्र रमाबाईंनी आयुष्यभर जपला. न्यायमूर्तींनी मनात रुजवलेल्या संस्कारबीजाचं रमाबाईंनी वटवृक्षात रूपांतर केलं. १९०१ साली न्यायमूर्ती निवर्तल्यावरही त्यांचं कार्य चालूच राहिलं. यानंतरच काही वर्षांनी सेवासदनची स्थापना त्यांनी केली आणि सेवासदन म्हणजे रमाबाई हे समीकरण आजही कायम आहे. स्त्रियांना शिक्षण देण्याबरोबरच अर्थार्जनासाठी विविध कौशल्य शिकवून स्वावलंबी करणारी ही संस्था! रमाबाईंच्या या विशाल दृष्टीने खरोखरीच कित्येकींचा उद्धार केला. अशा रमाबाईंच्या आणि न्यायमूर्तींच्याही स्मृतीला कृतज्ञतापूर्वक वंदन.

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.