82089
विद्यार्थी अभ्यासताहेत फुलपाखरांचा जीवनक्रम
सोलगाव शाळेतील उद्यान; पर्यावरण सेवा योजनेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ः घरासह परिसरातील बागेमध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या फुलपाखराचे साऱ्यांनाच आकर्षण असते. रंगीबेरंगी पंखांची सुंदर फुलपाखरं पाहिल्यानंतर साऱ्यांच्याच तोंडून ‘व्वा...खूपच छान !’ अशी प्रतिक्रिया येते. हे सर्व अनुभवतानाच फुलपाखरांचा जीवनक्रम अभ्यासण्याची संधी राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उभारलेल्या फुलपाखरू उद्यानातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. पर्यावरण सेवा योजना विभागाच्या सहकार्याने पाच वर्षापूर्वी उभारलेल्या या फुलपाखरू उद्यानाद्वारे मोबाईलमध्ये व्यस्त राहणारी युवा पिढी निसर्ग अन् पर्यावरणाशी एकरूप होण्यास मदत झालेली आहे.
पाठ्यपुस्तकामधून विद्यार्थ्यांना पर्यावरणाची माहिती दिली जाते. ती माहिती प्रत्यक्ष निसर्गात जावून अनुभवता यावी आणि पर्यावरणाचे जतन-संवर्धनाचे महत्व समजावे या उद्देशाने पर्यावरण विभागातर्फे पाच वर्षापूर्वी सोलगाव शाळेत फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले. केवळ फुलांमधील मध गोळा करण्यासाठी काही झाडांवर फुलपाखरू उडत जाते, तर काही झाडांवर अंडी घालण्यास जाते. काही झाडांच्या पानांचा खाद्य म्हणून फुलपाखरांना उपयोग होतो. त्यासाठी पश्चिम घाटातील विविध प्रजातीच्या वनस्पतींसह स्थानिक पातळीवरील झाडांचा अभ्यास करून फुलपाखरू उद्यानामध्ये झाडांची लागवड केली आहे. या झाडांचे विद्यार्थ्यांकडून संवर्धन आणि संगोपन केले जाते. याद्वारे फुलपाखरांचे संवर्धन होत असून विद्यार्थ्यांना अभ्यासही करता येतो.
चौकट १
प्रक्रियांचे निरीक्षण करणे शक्य
विशिष्ट झाडांवर फुलपाखरू अंडी घालतात. त्याचा अभ्यास करून अशा झाडांची लागवड या उद्यानात केली आहे. त्यामुळे अंडी घालण्यापासून त्याचा कोष तयार होणे, कोषातून अळी बाहेर येणे, त्याचे फुलपाखरू होणे अशा प्रक्रियांचे निरीक्षण या उद्यानात करता येते. पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू हवेत कसे झेपावते याचाही अनुभव विद्यार्थ्यांना घेता येतो. पुस्तकात अभ्यासल्याप्रमाणे फुलपाखरांचा जीवनक्रम जवळून अनुभवण्याची संधी उद्यानाने विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
कोट
पर्यावरण सेवा योजना विभागाच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात फुलपाखरू उद्यान उभारले आहे. त्यातील झाडांवर रंगीबेरंगी विविध जातीची फुलपाखरे येत असतात. फुलपाखरांचा जीवनक्रम अभ्यासणे यानिमित्ताने विद्यार्थ्यांना शक्य होत आहे.
- दिनेश चौगुले, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव