भोर, ता. २ ः भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि वॅट फ्रोम वोंगासाराम मॉनेस्ट्री बॅंकॉक (थायलंड) यांच्या वतीने बॅंकॉक येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या जागतिक धम्म परिषदेच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख व आंबेडकरी चळवळीतील डॉ. दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली.
डॉ. दीपक गायकवाड हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे स्कॉलर असून भारतातील अनेक विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले आहे. त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ''बुद्ध ॲन्ड हिज धम्म'' यावरील संशोधन, ''ब्लॅक मुव्हमेंट ॲन्ड आंबेडकरी मूव्हमेंट'' हे संशोधन उल्लेखनीय ठरले आहे. विविध ग्रंथसंपदेचे लेखन व संपादन करणाऱ्या डॉ. गायकवाड यांचे निवडीनंतर अभिनंदन केले जात आहे.