Latest Maharashtra News Updates : कोथरूड पोलिसांकडून तरुणींना शिवीगाळ, मारहाण प्रकरणी मोठे अपडेट्स
esakal August 05, 2025 07:45 PM
Nandurbar : दीड कोटी खर्चून घेतलेली बोट अॅम्ब्युलन्स बुडाली

आरोग्य विभागाने वर्षभरापूर्वी तब्बल दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्चून घेतलेली बोट ॲम्बुलन्स बुडाली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बोट ॲम्बुलन्स तैनात होती. बोट अॅम्ब्युलन्स सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर धरण क्षेत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आरोग्य विभागाच्या बोट अॅम्ब्युलन्सच्या मागील भागाचा सुमारे 30 टक्के भाग पाण्याखाली गेला. ही परिस्थिती निर्माण होताच आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

Solapur : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा 'कारनामा', आमदार नाही तरी लावला आमदार लोगो

अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याचा प्रकार समोर आलाय. आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याने सोलापुर जिल्ह्यात चर्चेचा उधाण आलंय. उमेश पाटील यांच्या एम एच 04 एच डी 5565 या नंबरच्या गाडीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे आमदाराचा लोगो असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा अधिकार आहे.

Pune : तरुणींना शिवीगाळ, मारहाण प्रकरणी मोठे अपडेट्स

कोथरूड मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून कोणता हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलीय. या चौकशी अंती पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्या नसल्याचं एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अहवाल सादर करण्यात आला आहे. हे प्रकरण झाल्यानंतर पीडित महिलांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्याचा देखील अहवाल आज पुणे पोलिसांना मिळणार आहे.

Eknath Shinde Live : एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स मालकांची बैठक बोलावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मल्टिप्लेक्स मालकांची बैठक बोलावली आहे. मराठी चित्रपटांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut Live : राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच- संजय राऊत

चीनने भारताची जमीन लाटल्याचा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला होता. तो योग्य आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Ratnagiri Live : रत्नागिरीत १७ ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १७ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रभारी अपर जिल्हा दंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी हे आदेश दिले आहेत.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आणि १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Valmik Karad : वाल्मीक कराडच्या वकिलांची उच्च न्यायालयात धाव, दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला होता

आरोपी वाल्मीक कराडने आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Sanjay Shirsath : होलार समाज महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा

नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाज मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री शिरसाठ यांच्या झाले. यावेळी त्यांनी होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची घोषणा केली. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.

Kolhapur News : कसबा बीडमध्ये दोघांना सापडली सुवर्ण मुद्रा

कसबा बीड : येथे दरवर्षी मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. यावेळी येथील दोघांना सुवर्णमुद्रा सापडली आहे. मृगाचा पाऊस पडला की येथे कुठे ना कुठे तरी सोन्याची मुद्रा सापडतेच. यावेळी येथील आक्काताई आनंदा जाधव यांना त्यांच्याच ‘जाधव मळा’ नावाच्या शेतात सुवर्णमुद्रा सापडली. त्यांना निशिगंधाची भांगलण करत असताना त्यांना हा बेडा सापडला.

मुंबईतील बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा; 'महादेवी हत्तीण' प्रकरणाचाही समावेश

जयसिंगपूर : संवेदनशील आणि भावनिक प्रश्न बनलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’च्या गुजरातहून परतीच्या प्रवासासाठी कायदेशीर पेचातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ५) मुंबईत होणाऱ्या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

Weather Update : उत्तरेकडील राज्यांत पावसामुळे हाहाकार; जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली : उत्तरेकडील राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात उत्तराखंडमधील तिघे जण वाहून गेले तर, हिमाचल प्रदेशातील तीन जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये पूर आला असून, राज्यातील गंगा, यमुना आणि बेतवा या नद्यांच्या पाणी पातळीत अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.

Supreme Court News : स्थानिक निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Latest Marathi Live Updates 5 August 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे स्पष्ट करतानाच २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका होतील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. तसेच भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शुल्कात आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. झारखंडच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन (वय ८१) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने येथील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.