विमानतळावर १४.७३ कोटींचा परदेशी गांजा जप्त
मुंबई, ता. ५ ः देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि साहित्य असल्याचा आभास निर्माण करून त्याआड परदेशी गांजाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीस कस्टम विभागाने रविवारी (ता. ३) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
या व्यक्तीकडे सुमारे १४.७ किलो गांजा सापडला. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल १४.७३ कोटी इतकी किंमत असल्याचे सांगण्यात आले. नेमक्या माहितीआधारे कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या या व्यक्तीस अडवून त्याच्याकडील सामानाची झाडाझडती घेतली. सामानात एक लिफाफा आढळला. या लिफाफ्यावर परराष्ट्र मंत्रालयाची फित आढळली. याच लिफाफ्यात गांजा दडवण्यात आला होता.