Kolhapur Village Gold Rain : पाऊस पडला की 'या' गावात शेतामध्ये सोनं सापडतेच, अनेक वर्षांपासून प्रत्यय
esakal August 06, 2025 12:45 AM

Gold Particles Soil : येथे दरवर्षी मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. यावेळी येथील दोघांना सुवर्णमुद्रा सापडली आहे.

मृगाचा पाऊस पडला की येथे कुठे ना कुठे तरी सोन्याची मुद्रा सापडतेच. यावेळी येथील आक्काताई आनंदा जाधव यांना त्यांच्याच ‘जाधव मळा’ नावाच्या शेतात सुवर्णमुद्रा सापडली. त्यांना निशिगंधाची भांगलण करत असताना त्यांना हा बेडा सापडला. स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना ‘बेडा’ असे संबोधले जाते. हा बेडा यादवकालीन असून, तो १.७ सेमी लांबीचा आणि ३.७५ ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित करते आहे.

Kolhapur friendship Day: मैत्री दिनाचा सुपर संडे..!'तरुणाईच्या पर्यटनस्थळांना भेटी'; संभाजी महाराज, कवी कलश मैत्रीचे स्टेटस

कसबा बीड शिलाहारराजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून परिचित आहे. येथे सापडणारी ‘बेडा’ यादवकालीन नाणी आहेत. महाराष्ट्रातील यादव घराण्याच्या काळात (१२ ते १४ वे शतक) चलनात होती. कसबा बीड येथे सापडलेला हा बेडा गद्यन (सोन्याची नाणी) प्रकारचा आहे. नाण्यांची मागील बाजू कोरी दिसते, तर या नाण्याचा आकार बशीसारखा असल्याचे दिसतो.

तानाजी बाबू यादव यांना असाच एक प्राचीन दागिन्याचा तुकडा सापडला आहे. लक्ष्मी मंदिर परिसरातील शेतात भांगलण करताना त्यांना हा तुकडा सापडला. या तुकड्याचे वजन ०.४५ ग्रॅम इतके आहे. या तुकड्यावर अलंकारिक आकृत्यांचे अंकन दिसते. या वर्षातील ही तिसरी घटना आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकन करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.