आशिया कप 2025 स्पर्धेला आता महिन्याभरापेक्षा कालावधी बाकी आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत-पाकिस्तान या दोन्ही कट्टर संघांना पुन्हा एकदा एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे उभयसंघात 14 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. क्रिकेट विश्वाला कायमच भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसह कोणत्याही क्रीडा स्पर्धेत खेळू नये, अशी जनसामन्यांची भावना आहे. वर्ल्ड लिजेंड चॅम्पियन्स 2025 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धच्या दोन्ही सामन्यांवर बहिष्कार घातला. त्यानंतर आशिया कप स्पर्धेतील सामन्याला वाढता विरोध पाहायला मिळत आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेतील उभयसंघातील सामना रद्द होणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर उभयसंघात 8 ऑगस्टपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तानसाठी ही मालिका अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानसमोर या मालिकेत 15 खेळाडूंचं आव्हान असणार आहे.
विंडीज क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय मालिकेला काही तास बाकी असताना 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शाई होप विंडीजचं नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
वेगवान गोलंदाज रोमरियो शेफर्ड याचं संघात कमबॅक झालं आहे. तर जसप्रीत बुमराह प्रमाणे वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तसेच केसी कार्टी, रोस्टन चेज आणि अमीर जंगू यांनाही संधी मिळाली आहे.
पहिला सामना, 8 ऑगस्ट
दुसरा सामना, 10 ऑगस्ट
तिसरा सामना, 12 ऑगस्ट,
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिन्ही एकदिवसीय सामने हे एकाच स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. हे सामने त्रिनिदादमधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे खेळवण्यात येणार आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी विंडीज सज्ज
पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विंडीज टीम : शाई होप (कर्णधार), ज्वेल एंड्रयू, जेडिया ब्लेड्स, केसी कार्टी, रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्ड, जस्टीन ग्रीव्स, अमीर जंगू, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स आणि रोमारियो शेफर्ड.