भारतीय इंग्लंड दौऱ्यात फक्त पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिकेचं काही आयोजन नव्हतं. कारण भारतीय संघाचं वेळापत्रक आधीच ठरलं होतं. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार होता. पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. कारण बांगलादेशमधील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, श्रीलंका प्रीमियर लीग पुढे ढकल्याने श्रीलंकेविरुद्ध मालिका होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यालाही पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ थेट सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा खेळण्यास उतरणार आहे. पण ही स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेतही रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज खेळाडूंना मैदानात कधी पाहता येईल याची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी एकमेव वनडे फॉर्मेट आहे.
आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे आता दोन्ही दिग्गज खेळाडूंना मैदानात पाहण्याची ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळेल. कारण भारतीय संघ टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पण प्रश्न असा आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार की नाही. कारण टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेण्यापूर्वी रोहित शर्मा तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार होता. त्याच्या निवृत्तीनंतर टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर दिली गेली. तर कसोटी संघाची धुरा शुबमन गिलकडे सोपवली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा या दौऱ्यात नेतृत्व करणार की नाही? हा देखील प्रश्न आहे.
रोहित-विराट यांनी शेवटचा सामना आयपीएल 2025 मध्ये खेळला होता. या स्पर्धेदरम्यान दोघांनी कसोटीतून निवृत्ती घेत आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून दोन्ही दिग्गज खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान, आशिया कप स्पर्धेत जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आराम दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्याला कसोटी मालिकेत दुखापत झाल्याच्या वावड्याही उठल्या आहेत. मात्र त्यात कितपत तथ्य हे काही सांगता येणं कठीण आहे. बीसीसीआयने अद्याप तरी याबाबत काही सांगितलं नाही. बुमराहला आशिया कप स्पर्धेत आराम दिला गेला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करू शकतो.