आपल्याला आयुष्यात जेव्हा पर्याय मिळतात, त्यावेळेला त्यातून एखादी गोष्ट निवडणं हे कौशल्य असतं. आपल्याला काय हवं, काय नको, त्यावेळची आपली गरज काय, हे समजणं अत्यंत आवश्यक असतं.
साधं ऑफिसला जाताना कुठले कपडे घालावेत, आज भाजी कुठली करावी, किंवा घराला कुठला रंग द्यावा, ऑनलाइन मेकअप प्रॉडक्टमधले कुठले प्रॉडक्ट ऑर्डर करावेत? इथपासून कित्येक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आणि त्या वेळेला साजेशी गोष्ट निवडणं किंवा त्याबाबतीत निर्णय घेणं हे काही जणांसाठी खूप कठीण असतं.
शॉपिंग करताना तर काही जण झटक्यात शॉपिंग करून बाहेर येतात, तर काही जणांना दहा दुकानं फिरल्याशिवाय मनासारखी गोष्ट मिळत नाही. माझ्या मुलाकडे म्हणजे कबीरकडे हे कौशल्य आहे. त्याला बाहेर कुठे जायचं असं म्हटल्यानंतर शंभर कल्पना डोक्यात येतात आणि त्यातली कुठली कल्पना अधिक योग्य याबाबतीतही तो ठाम असतो.
आता पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जायला हवं तर कुठे जायचं असा मला प्रश्न पडला आणि असंख्य पर्याय समोर होते, तेव्हा कबीरनं झटक्यात सोल्युशन काढलं. ‘आत्ता हिल स्टेशनला जाण्यात मजा आहे म्हणून पाचगणीला जाऊ आणि नंतर तुला खूप दिवस सज्जनगडावर जायचं होतं, तर तिथून ते जवळ आहे म्हणून मग तिकडे जाऊया’, असं पटकन सांगून टाकलं.
त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यही ठरला आणि आमची ही छोटीशी ट्रिप आनंदात गेली. माझ्या लहानपणी माझे बाबा आवर्जून पावसाळ्यात कुठे ना कुठेतरी घेऊन जायचे त्यांचीच आठवण म्हणून की काय पण कबीरलाही तसा आनंद मिळावा असं मला कायम वाटतं.
प्रत्येक पावसाची एक आठवण निर्माण करणं यामध्ये खरच वेगळी मजा आहे. तसंच प्रत्येक सण किंवा वाढदिवस खास करण्यासाठी माझे बाबा धडपड करत असत. याच आठवणी तुम्हाला प्रत्येक सण आणि ऋतूचा फील देत असतात.
आता सुरू होणाऱ्या सणासुदींना आपण कपडे निवडणं हा पण कौशल्याचा भाग आहे असं मला वाटतं. त्या सणाची एक आठवण आपल्या कॅमेरात कॅप्चर होतेच; पण त्याचबरोबर आपल्या मनातही कुठेतरी घर करते, त्यामुळे अशा खास दिवशी खास दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं; पण अशा वेळेला कपड्यांची निवड कशी करायची याबाबतीत संभ्रम असतो.
आपल्या भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणाला खास उत्साह असतो. त्यामुळे कपड्यांची निवड करताना फक्त सौंदर्य नव्हे, तर त्या सणाच्या पार्श्वभूमीचा, वेळेचा आणि वातावरणाचा विचार करणं आवश्यक असतं. त्यामुळे खूप पर्याय असले, तरी योग्य निवड काय करायची याबाबतीत सर्जनशीलता दाखवायला लागतेच.
अर्थातच सणासुदीच्या काळात पारंपरिक कपड्यांना प्राधान्य द्यावं. महिलांसाठी साडी, लहंगा, अनारकली ड्रेस किंवा चिकनकारी सूट हे उत्तम पर्याय असतात आणि बऱ्याच साइट्सवर आता तसे सेलही लागलेले असतात. कपड्यांचा रंग निवडताना सणाचा मूळ रंग लक्षात घ्यावा जसे दिवाळीसाठी गडद लाल, सोनसळी किंवा मोरपंखी छटा, तर गणेशोत्सवासाठी पांढरा, चंदेरी किंवा केशरी.
फॅब्रिक निवडतानाही हवामानाचा विचार करायला हवा. हिवाळ्यात बनारसी सिल्क किंवा ब्रोकेडसारखे फॅब्रिक आपण घालू शकतो. परिधान सुटसुटीत स्टायलिश आणि आरामदायक असायला हवेत. असे कपडे निवडायला हवेत जे पारंपारिक ते सोबत तुम्हाला आत्मविश्वास देतील आणि तुमचं व्यक्तिमत्व खुलवतील.
हे नक्की करा
१) सणानुसार रंग निवडायला हवेत. प्रत्येक सणाचं एक खास रंगतत्त्व असतं, त्याचा वापर करायला हवा.
२) आरामदायी फॅब्रिक वापरणं गरजेचं ठरतं. खूप वेळ बसण्याचे किंवा फिरण्याचे कार्यक्रम असतील, तर हलकं आणि ब्रिदेबल फॅब्रिक निवडा.
३) आपण कपडे मिक्समॅच केले तरीही ते तितकेच नवीन वाटू शकतात. म्हणून जुन्या साड्यांपासून नवीन ब्लाऊज, दुपट्टा बनवा किंवा फ्युजन लूक ट्राय करू शकता.
४) एथनिक टचसाठी जर्दोसी, कुंदन, चिकनकारी काम असलेले कपडे उत्तम ठरतात. हाताने केलेले भरजरी काम हे आकर्षक वाटते.
५) कपड्यांना पूरक अशा ॲक्सेसरीज आणि हलकासा पारंपरिक मेकअप लूक यामुळे पूर्णता येते. शिवाय साजेसे पारंपरिक दागिने तुमच्या सौंदर्यात भर पाडत असतात.