गुरुवारी रात्री 11 वाजता दिल्लीजील निजामुद्दीन स्टेशनजवळ अत्यंत खळबळजनक घटना घडली. अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीचं दोन तरुणांशी पार्किंगवरून भांडण झालं. स्कूटीच्या पार्किंगवरून झालेलं हे भांडण पुढे इतकं वाढलं की उज्ज्वल आणि गौतम या दोन तरुणांनी मिळून आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आसिफच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या उज्जव आणि गौतम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघं सख्खे भाऊ असल्याचं कळतंय. या प्रकरणात आता एका मुलीचंही नाव समोर आलं आहे.
आसिफ कुरेशीच्या हत्येप्रकरणात आता शैली या मुलीचं नाव समोर आलं आहे. शैलीच्या सांगण्यावरूनच उज्ज्वल आणि गौतम यांनी आसिफवर हल्ला केल्याचं कळतंय. याप्रकरणी आता आसिफची पत्नी साइनाज कुरेशीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. तिच्या मते, शेजाऱ्यांनी आधी आसिफला शिवीगाळ केली. आसिफ कामावरून परतला होता. तेव्हा त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी समोरून हटवण्यास सांगितलं. याच क्षुल्लक गोष्टीवरून भांडण सुरू झालं. आसिफच्या पत्नीने असंही सांगितलंय की, शेजाऱ्यांशी त्यांचं नोव्हेंबर 2024 मध्येही भांडण झालं होतं. तर आसिफचा भाऊ जावेद आणि काका सलीम यांनी म्हटलंय की, अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून आरोपींनी आसिफवर निर्घृण हल्ला केला. त्यांना अत्यंत कठोर शिक्षा देण्याची मागणी आसिफच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही आरोपी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आसिफच्या घरात घुसून त्याला मोठ्या दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आसिफच्या पत्नीने केला आहे. “त्यांनी नोव्हेंबरमध्येही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक मोठा दगड आणला होता. आमच्या घरात घुसून त्यांनी धमकी दिली होती”, असा खुलासा पत्नीने केला.
भोगल बाजार लेनमध्ये ही घटना घडली आहे. याविषयी पोलिसांनी सांगितलं, ‘अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची निजामुद्दीन परिसरात दोन जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मिळालेल्या तक्रारीनुसार, पार्किंगवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर उज्ज्वलने आसिफवर हल्ला केला. या हल्ल्यात आसिफचा मृत्यू झाला. आसिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आम्ही अहवालाची प्रतीक्षा करतोय.’