कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण काही स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे पदरी निराशा पडली आणि पुढची सर्व गणित बिघडली. रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 अंतिम सामना आणि वनडे वर्ल्डकप सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अगदी अंतिम फेरीत पराभूत झाल्याने पदरी निराशा पडली. पण 2024 हे वर्ष रोहित शर्मासाठी चांगलं गेलं. या वर्षात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर त्याने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर नाव कोरलं. तसेच कसोटी मालिकांकडे लक्ष्य केंद्रीत केलं होतं. पण दुर्दैवाने अंतिम फेरी काही गाठू शकले नाही. त्यामुळे अंतिम सामना होण्यापूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. आता रोहित शर्मा वनडे क्रिकेट खेळणार आहे. पण किती दिवस आणि कधी रिटायर होईल याबाबत चर्चा रंगली आहे.
रोहित शर्माचे लहानपणीचे क्रिकेटच कोच दिनेश लाड यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे. रोहित शर्मा कधी निवृत्त होईल त्याबाबत सांगितलं आहे. दिनेश लाड यांनी गौरव मंगलानी यांच्या पॉडकास्टवर सांगितलं की, ‘जेव्हा रोहितने टी20मधून निवृत्ती घेतली तेव्हा त्याने कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतली नव्हती. कारण त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकायचा होता. पण 2023 मध्ये आपण हरलो. त्यात दुर्दैवाने 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचलो नाहीत. यासाठी त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली.’
‘रोहित शर्माचं एकमेव लक्ष्य आता 2027 वनडे वर्ल्डकप जिंकण्यावर आहे. यानंतर तो या फॉर्मेटमधून निवृत्ती घेईल.’, असं दिनेश लाड यांनी सांगितलं. 2027 चा वनडे वर्ल्डकप दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी आता दोन वर्षांचा अवधी शिल्लक आहे. म्हणजेच या दोन वर्षात जास्तीत जास्त वनडे मालिका खेळणं गरजेचं आहे. पण या वर्षी तरी फार काही मालिका नाहीत. त्यात रोहित शर्माला त्याचा फॉर्म टिकवणं देखील आव्हान आहे. सध्या तरी त्याच्याकडे कर्णधारपद आहे. मात्र पुढे ही गणितं कशी बदलणार हे काही सांगता येत नाही.