विधानसभा निवडणुकीआधी मला दिल्लीत दोन माणसे भेटली होती. त्यांनी मला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता या गौप्यस्फोटानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवारांना भेटलेली ती माणसं उद्धव ठाकरेंनाही भेटली होती, त्यांनी आम्हाला 60 ते 65 कठीण जागा जिंकून देण्याचा दावा केला होता, असा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांच्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही लोक भेटले होते. तुमच्या ज्या 60 ते 65 जागा अडचणीच्या आहेत त्या सांगा, आम्ही तुम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ, असा मोठे विधान संजय राऊतांनी केले.
संजय राऊत काय म्हणाले?“काल शरद पवार यांनी जो विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागा मिळवून देतो विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली. आता त्याही पुढे जाऊन मी सांगतो या पैकी काही लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते. हे लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितले की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. देशातले वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100 टक्के जिंकू आणि खरोखर महाराष्ट्रात आम्ही ते यश प्राप्त केलं. त्यामुळे निवडणुकीत अशा प्रकारे घोटाळे करून आम्हाला जिंकायची गरज नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
“विधानसभा निवडणुकीपूर्वी ते लोक परत आले. आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आमचा विजय झाला आहे. विधानसभेत आम्ही नक्की जिंकू. ते लोक म्हणाले की तुमच्या ज्या 60 ते 65 जागा कठीण वाटत आहेत, त्या सांगा. आम्ही तुम्हाला त्या ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण त्यांनी इतकंही सांगितलं की तुम्हाला जरी हे आवश्यक वाटत नाही तरी समोर जे सरकारमध्ये आहे, त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे, त्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवाने जे शरद पवार म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं दिसतंय”, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले होते?शरद पवार यांनी काल अनेक खळबळजनक खुलासा केला होता. विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झाल्या, तेव्हा दिल्लीत मला दोन लोक भेटायला आले होते. त्यांची नावे व पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. आम्ही तुम्हाला २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे मी असे लोक भेटतच असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांनी आपले म्हणणे राहुल गांधी यांच्यापुढे मांडले. लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही दोघांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जनतेच्या दरबारात जाऊन मते मागण्याची भूमिका आम्ही पसंत केली. पण गुरुवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून मतचोरीची मांडणी करण्यात आली,” असे शरद पवार यांनी सांगितले होते.