Sanjay Raut : माजी उपराष्ट्रपती धनखड कुठायत? राजीनाम्यानंतर दिसलेच नाहीत, काळजी वाटते; संजय राऊतांचं गृहमंत्र्यांना २ पानी पत्र...
esakal August 11, 2025 03:45 PM

Sanjay Raut addresses concerns over former Vice President Jagdeep Dhankhar’s whereabouts in a letter to Home Minister Amit Shah : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल यांनी काल हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धनखड यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासंदर्भात थेट गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानी पत्र लिहिले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. राजीनामा दिल्यानंतर माजी उपराष्ट्रपती कुठेही दिसले नाहीत. २१ जुलै रोजी संसदेचे सत्र संपल्यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. हे आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होते. पण त्याहून आश्चर्यकारक म्हणजे राजीनामा दिल्यानंतर ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे ते कुठे आहेत? त्यांच्याबरोबर नेमके काय घडले? त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

दिल्लीतील काही मीडिया अहवालांनुसार, ते त्यांच्या घरी असून सुरक्षित नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काळजी वाटते आहे. माजी उपराष्ट्रपती नेमके कुठे आहेत? त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही? याची माहिती देशाला मिळणे आवश्यक आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले.

Sanjay Raut : मोदींनी मुंबईसह महाराष्ट्र लाडक्या उद्योगपतींना विकला...संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पुढे बोलताना त्यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याची माहिती दिली. राजीनामा दिल्यानंतर माजी उपराष्ट्रपती बेपत्ता आहेत. इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे काही खासदार आता सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहेत. पण मला वाटते की त्यापूर्वी तुमच्याकडून त्यांची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पत्र लिहित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.