भारतावर अणुहल्ला करण्याची पाकिस्तानची धमकी, असीम मुनीरमध्ये एवढी हिंम्मत आली तरी कुठून?
GH News August 12, 2025 12:21 AM

India Vs Pakistan : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी फ्लोरिडात असताना भारताविरोधात अण्वस्त्रहल्ला करण्याची उघड धमकी दिली. सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावाची स्थिती असली तरी दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही हल्ला केलेला नाही. त्यामुळेच मुनीर यांनी ही दमकी का दिली? प्रश्न अनेकांना पडला आहे. मुनीर यांच्यात एवढी हिंम्मत आली तरी कुठून? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या पाकिस्तानकडे एकूण 160 तर भारताकडे एकूण 180 अण्वस्त्र आहेत.

मुनीर यांच्या धमकीचा नेमका अर्थ काय?

असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्करात सर्वोच्च पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाला वेगळे महत्त्व प्राप्त होते. पाकिस्तानने याआधीही भारताला अण्वस्त्रहल्ला करण्याची धमकी दिलेली आहे. अशा प्रकारची धमकी देऊन पाकिस्तान भारताला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुनीर यांनी यावेळी परदेशात जाऊन भारताला अण्वस्त्रहल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीतून पाकिस्तानला दक्षिण आशियाला पुन्हा एकदा अस्थिरतेकडे न्यायचे आहे, असा कयास लवला जात आहे.

पाकिस्तानात लष्कराची सत्ता, पुन्हा एकदा अधोरेखित

तसेच पाकिस्तानमध्ये लष्कराचा राजकीय निर्णय घेण्यात हस्तक्षेप असतो, असे म्हटले जाते. सध्या मुनीर यांनी भारतावर अण्वस्त्रहल्ला करण्याची धमकी दिल्याने पाकिस्तानमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारची नव्हे तर अप्रत्यक्षपणे लष्कराचीच सत्ता असते, असाही निष्कर्ष काढला जात आहे.

पाकिस्तानमध्ये एवढी हिंम्मत नेमकी कुठून आली?

दरम्यान, मुनीर यांनी थेट अमेरिकेत जाऊन भारताला अशा प्रकारची धमकी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारले आहेत. पाकिस्तानमध्ये आपला व्यापार विस्तार व्हावा या उद्देशाने अमेरिकेकडून पाकिस्तानला झुकते माप दिले जात आहे. असे असतानाच आता मुनीर यांनी थेट अमेरिकेत जाऊन भारताला धमकी दिली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या जीवावर तर पाकिस्तान अशा प्रकारची आगळीक करत नाहीये ना? असेही विचारले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.