गणेशमूर्ती उद्योगाची भरारी
जीआय मानांकनाने मागणीत वाढ, उलाढाल वाढणार
राजेश कांबळे : सकाळ वृत्तसेवा
पेण, ता. ११ : तालुक्यातील गणेशमूर्ती जगभरातील भाविकांचे आकर्षण राहिले आहे. भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यानंतर मूर्ती कारखानदारांची उलाढाल ३०० कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारागिरांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या पेटंट जर्नलमध्ये पेणच्या मूर्तींना २०२३ मध्ये जीआय मानांकनाची घोषणा करण्यात आली, पण पीओपीबंदीच्या बातम्यांमुळे पेणचा गणेशमूर्ती उद्योग गेली दोन वर्षे प्रकाशझोतात राहिला. न्यायालयीन लढ्यात मिळालेल्या विजयानंतर येथील मूर्ती उद्योगाला भरारी आली आहे. त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र, किमानकौशल्य विभाग आणि मूर्ती कारागिरांसाठीच्या पतधोरणात बॅंकाने केलेल्या सुधारणामुळे मूर्तिनिर्मिती उद्योगाला अधिकच बळकटी दिल्याचे दिसून येत आहे. उद्योगाला पोषक वातावरणामुळे मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेण तालुक्यातील हजारो कारागिरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.
----------------------
निर्यातीवरील दृष्टिक्षेप
प्रमाण : पेण तालुक्यातून दरवर्षी ३० ते ४५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात. शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा समावेश असतो.
मागणी असणारे देश : अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, थायलंड आणि वेस्ट इंडीज.
मूर्तींचा आकार : परदेशात पाठवल्या जाणाऱ्या मूर्ती एक फुटापासून ते सत फुटांपर्यंतच्या असतात.
प्रक्रिया : मूर्ती गणेशोत्सवाच्या ४० ते ६० दिवस आधीच पाठवल्या जातात. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरातून जगभरात जातात.
निर्यातीची उलाढाल : ७५ कोटी रुपये
-----
गणेशमूर्ती निर्मितीची आकडेवारी
मूर्तींची संख्या : २५ ते ३५ लाख
प्लास्टर ऑफ पॅरिस - २० लाख
शाडू मातीच्या मूर्ती - १० लाख
पेण तालुक्यातील कारखाने - १,३००
कुशल कारागीर - ६,०००
अर्धवेळ कारागीर - ५,०००
सहाय्यक - २,०००
वार्षिक उलाढाल - ३०० कोटी
----------------------------
गणेशोत्सवाकरिता काही दिवसच शिल्लक असल्याने कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग मूर्तींवरील रंगरंगोटी यासह दागदागिन्यांची सजावटीची तयारी सुरू आहे. गणेशभक्तांनी कपड्यावरील डायमंड मूर्तीला अधिक पसंती दिली आहे. दररोज हजारो ग्राहक मूर्ती पाहण्यासाठी कारखान्यांमध्ये येत आहेत. त्यामुळे आता जवळपास माल शिल्लक राहिलेला नाही.
- सचिन समेळ, दीपक कला केंद्र, पेण
------
प्रत्येक उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान येत असतो. निर्मिती, विपनन आणि निर्यातीमधील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोगासाठी पेणच्या मूर्तिकारागिरांना प्रोत्साहन दिले जात आहे. कारागिरांनी हे कौशल्य अवगत केल्याने त्यांना चांगला फायदा होत आहे.
- अमिता पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य व उद्योजकता विकास