कचरा संकलन करणाऱ्या गाड्या विनानंबर प्लेट
डोंबिवली, ता. ११ : कल्याण डोंबिवली महापालिकेने कचरा संकलनासाठी ठेका दिलेल्या सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडून सुमारे ५० छोट्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या नवीन गाड्या गेल्या दोन महिन्यांपासून केडीएमसी परिसरातील रस्त्यावर धावत आहेत; मात्र या गाड्यांवर आरटीओ नोंदणी न करता, नंबर प्लेट न लावता गाड्या रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी कैलास सणस यांनी केला आहे.
चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्ननुसार केडीएमसी हद्दीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून, महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे काम सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिले आहे. या खर्चाचा भार महापालिकेने अतिरिक्त कररूपात नागरिकांवर टाकल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सुमित कंपनीला टेंडर मिळाल्यानंतरच स्थापन झाले असून, त्यांना फक्त पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकीपिंगचा अनुभव आहे. त्यानंतरही महापालिकेने कचरा संकलनाचा महत्त्वाचा कामकाज ठेका दिल्यामुळे चर्चा रंगली आहे.
त्याचबरोबर मद्य घोटाळाप्रकरणी झारखंडमधील पथकाने कंपनीचे मालक अमित साळुंखे याला अटक केली आहे. याशिवाय कंपनीतील काही एजंटांनी महापालिकेत कामावर लागण्यासाठी कामगारांकडून पैशाची मागणी केली असल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला होता.
आरटीओवर प्रश्नचिन्ह
शिवसेना पदाधिकारी कैलास सणस यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या रस्त्यावर सुमित कंपनीच्या ५० पेक्षा अधिक छोट्या गाड्या आरटीओ नोंदणीविना व नंबर प्लेटशिवाय धावत असल्याचा भांडाफोड केले आहे. सामान्य नागरिकांच्या वाहनांना नंबर प्लेट नसल्यास कडक कारवाई केली जाते, परंतु या कंपनीच्या गाड्यांवर आरटीओची मेहरबानी का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.