आयटीआय प्रवेशाची
केंद्रीय समुपदेशन फेरी
रत्नागिरी : रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाच्या चौथ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ज्यांनी आयटीआय रत्नागिरी येथे अर्ज भरले आहेत व कोणत्याही व्यवसायात प्रवेश घेतलेला नाही तसेच ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत ऑनलाइन अर्ज केलेले नाहीत अशा उमेदवारांनी २० ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज करावेत, असे आवाहन शासकीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. आयटीआय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथील उपलब्ध असलेल्या व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेशखात्यात प्रवेश लॉगिन करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, नाचणे रोड येथे समुपदेशन फेरीसाठी २२ आणि २३ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. २५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता उमेदवाराने निवड केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
रत्नागिरीत सोमवारी
महिला लोकशाही दिन
रत्नागिरी ः जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन १८ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळवले आहे. लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांच्या वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
आपत्ती व्यवस्थापनावर
‘डीबीजेत’ प्रशिक्षण
चिपळूण ः येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात एनडीआरएफ पुणे ०५ बटालियनमार्फत टीम कमांडर जी. बी. प्रमोद रॉय यांच्या नेतृत्वाखाली ही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रशिक्षणात एनडीआरएफ पथकाच्या जवानांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी घ्यावयाच्या दक्षता, उपाययोजना तत्काळ प्रतिसाद व सुरक्षिततेच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.