वेध गणेशोत्सवाचे--लोगो
-rat१२p९.jpg-
२५N८३८७१
राजापूर ः मूर्ती रंगवताना मूर्तिकार अनंत आडविलकर.
----
आडविलकर कुटुंबाने जपलाय मूर्तिकलेचा दीडशे वर्षांचा वारसा
चित्रशाळेत लगबग; गणेशमूर्ती जिल्ह्यासह कर्नाटक राज्यापर्यंत पोचल्या
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ : शहरातील वरचीपेठ येथील आडविलकर कुटुंबीयांचा सुमारे दीडशे वर्षापासून सुरू असलेला गणेशमूर्ती घडवण्याचा मूर्तिकलेचा वारसा मोरया मूर्तिकला केंद्राच्या माध्यमातून अनंत आडविलकर यांनी सुरू ठेवला आहे. उपजत कलागुण अन् कौशल्याला व्यावसायिकतेची जोड देत त्यांनी मूर्तिकलेतील आवड जोपासली आहे. राजापूरसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील गणेशभक्तांच्या घरी गणेशमूर्ती विराजमान होतात. त्यांनी घडवलेल्या गणेशमूर्ती कर्नाटक राज्यातही पोहोचल्या आहेत.
अनंत आडविलकर यांच्या घरामध्ये गणेशमूर्ती घडवण्याचा व्यवसाय त्यांचे पणजोबा हरी यांच्यापासून सुरू होता. पुढे तो वारसा अनंत यांचे वडील भास्कर यांनी सुरू ठेवला. मूर्तिकलेची आवड लहानपणापासूनच होती. त्यातून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत मूर्तिकला केंद्रामध्ये काम करताना गणेशमूर्ती घडवण्याचे कौशल्य अधिक विकसित झाल्याचे अनंत सांगतात. सुमारे दीडशे वर्षापासून सुरू असलेला मूर्तिकलेचा वारसा आजही आपण पुढे सुरू ठेवल्याचे ते सांगतात. मोरया मूर्ती कलाकेंद्रामध्ये मूर्ती घडवणे, रंगकाम करणे आदींसाठी सुरेश मांडवकर, विनय धोपटे, प्रफुल्ल साईल, मयूरी आडविलकर यांचे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.
चौकट
गणेशमूर्तींची खासियत
अनंत आडविलकर यांच्या ‘मोरया’ मूर्ती कलाकेंद्राची आकर्षक रंगसंगती आणि विविध प्रकारातील मूर्ती ही खासियत आहे. एक ते दोन फूट उंचीपासून ते चार-पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती या कार्यशाळेमध्ये आहेत. डोळ्यांची रेखणी, साजेसे लक्षवेधी रंगकाम हेही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
चौकट
अशीही सामाजिक बांधिलकी
दीडशेहून अधिक मूर्ती घडवणारे अनंत आडविलकर आपल्या मोरया मूर्ती कलाकेंद्रातून चार गरीब कुटुंबांना मोफत गणेशमूर्ती उपलब्ध करून देत आहेत. त्या कुटुंबीयांना गणेशमूर्ती मोफत वडिलांकडून दिल्या जात होत्या. तीच परंपरा वडिलांच्या सूचनेनुसार, आजही कायम सुरू ठेवल्याचे ते सांगतात. गणेशमूर्तीसोबत त्या कुटुंबांना पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीच्या ठिकाणी ठेवण्यासाठी विविध फळेही देत असल्याचे ते सांगतात.