नाशिक: राज्यात कार्यरत असलेल्या २१ हजार ग्रंथपालांना भविष्यनिर्वाह निधी, अर्जित रजा, वेतनश्रेणी, महागाई भत्ता, निवृत्तिवेतन यापैकी काहीही मिळत नाही. याच कारणामुळे सध्या कार्यरत असलेली ग्रंथपालांची शेवटची पिढी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आले आहे. उच्चशिक्षित असलेल्या या ग्रंथपालांची अवस्था आजच्या घडीला उपेक्षित, वंचित आणि दयनीय होत चालल्याची माहिती राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
राज्यात ११ हजार १५५ ग्रंथालये आहेत. त्यापैकी जिल्ह्यात शासनमान्य २६२ ग्रंथालये आहेत तर, राज्यात शंभर वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ असणारे एकूण ८३ ग्रंथालये आहेत. त्यामध्ये २१ हजार ग्रंथपाल कार्यरत आहेत. ‘अ’ वर्गाच्या ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन १६ हजार ८०० रुपये तर, ‘ड’ वर्गाच्या ग्रंथपाल यांना वर्षापोटी २४ हजार रुपये इतके वेतन मिळते. सध्या महागाईच्या काळात या वेतनात उदरनिर्वाह कसा होणार ? असा मोठा प्रश्न या सर्वांच्या समोर आहे.
ग्रंथालयात येणाऱ्या वाचकाला लेखक, विशिष्ट प्रकाशनाचे पुस्तक शोधून देणे, त्या पुस्तकाची नोंद ठेवणे, पुस्तकांची देखभाल, पुस्तकांची मोजदाद ठेवणे आदी कामे ग्रंथपाल यांना करावी लागतात. ज्ञानदानाचे कार्य ग्रंथपाल यांच्याकडूस दररोज होत असते. मात्र, आजच्या घडीला ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या या ग्रंथपालांची अवस्था बिकट झाली आहे. आर्थिक विवंचनेतून मागील दहा वर्षात ग्रंथपालांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
ग्रंथालये अद्ययावत करण्यासाठी धोरण
दोन महिन्यांपूर्वी शासनाने ग्रंथालय धोरण समितीची स्थापना केली आहे. यामध्ये दहा सदस्य असून ग्रंथालयांना बळकटी मिळण्यासाठी पुढील ५० वर्षाचा कार्यकाल लक्षात घेता ग्रंथालये अद्ययावत कशी करता येतील यासाठी धोरण आखले जाणार आहे.
ग्रंथालय कर्मचाऱ्यांची अवस्था बिकटच
सध्या वाचनालयामध्ये काम करणाऱ्या ग्रंथपाल यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना महिनाभर दहा-बारा तास काम करून केवळ पाच ते आठ हजार रुपये मानधन मिळत आहे. त्यातही सुट्टयांची मारामार, वेतनवाढ नाही की कोणत्या सवलती नाही. जेमतेम शिक्षण असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता कामाचा दुसरा पर्यायही शिल्लक राहिला नसल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे.
Satara News:'ओंकार पवार यांची नाशिकला बदली'; जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची घेतली सूत्रेकामानिमित्त राज्यभर फिरतो तेव्हा ग्रंथालयातील ग्रंथपालांची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे दिसते. ग्रंथालयासारख्या निर्धन व्यवस्थेतून आज प्रशासकीय अधिकारी घडत आहेत. मात्र, शासनाचे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या अवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
-डॉ गजानन कोटेवार, अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघ