आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवण्यासाठी सर्वच संघांनी खेळाडूंसाठी फिल्डिंग लावली आहे. मागच्या पर्वात धडा घेत संघाची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे. असं असताना संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यासाठी त्याने स्वत:च फ्रेंचायझीकडे रिलीजसाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे संजू सॅमसनसाठी फ्रेंचायझी रवींद्र जडेजा किंवा ऋतुराज गायकवाडला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. राजस्थान रॉयल्सने यासाठी चेन्नई सुपर किंग्ससोबत संपर्क साधला आहे. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी काही ट्रेड झाले तर आश्चर्य वाटायला नको. या दरम्यान राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या जागी एका खेळाडूची मागणी केली आहे. त्यांनी रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेपैकी एका खेळाडूला संघात सहभागी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण सीएसकेने या प्रकरणी राजस्थान रॉयल्सला काहीच उत्तर दिलेलं नाही.
संजू सॅमसनची सध्याची किंमत ही 18 कोटी रुपये आहे. त्यामुळे ट्रेड करून संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागेल. अशा स्थितीत मिनी लिलावात आला तर त्यासाठी तडजोड होऊ शकते. आयपीएल मिनी लिलावापूर्वी एक आठवड्या आधी ट्रेड विंडोतून देवाणघेवाण करता येते. फ्रेंचायझी आपल्या सहमतीने एका क्रिकेटपटूला दुसऱ्या खेळाडूच्या बदल्यात किंवा पैसे मोजून घेऊ शकतो. राजस्थान रॉयल्स हीच रणनिती अवलंबत आहे. पण राजस्थानने ज्या खेळाडूंची मागणी केली आहे, ते खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा कणा आहेत. त्यामुळे आता हा पेच आता कसा सुटणार याकडे लक्ष लागून आहे.
आयपीएल 2026 स्पर्धा टी20 वर्ल्डकपनंतर होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व वाढणार आहे. कारण वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. गतविजेता भारतीय संघ यासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय संघ संजू सॅमसन असण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत संजू सॅमसनचा भाव वधारला आहे. त्याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स इच्छुक असल्याची चर्चा आहे.