एसटी चालक-वाहकांसाठी मोफत एक्स-रे कॅम्प
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः एसटी कर्मचाऱ्यांचे काम सतत प्रवास, धूळ आणि अनियमित आहाराशी संबंधित असल्यामुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी विभाग नियंत्रकांशी भेटून टीबी प्रतिबंधासाठी ही मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली. या मोहिमेत अलिबाग आगारात १७९ आणि पेण आगारात ७० कर्मचाऱ्यांचे एक्स-रे करण्यात आले. यापैकी सहा जणांचे नमुने तपासण्यात आले असून, सर्व अहवाल नकारत्मक आले आहेत.
विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी टीबीमुक्त रायगड अभियानात एसटी विभागाचे योगदान महत्त्वाचे असून, सर्वांनी मोफत एक्स-रे तपासणी करून घ्यावी आणि प्रत्येक आगारात नियोजनबद्ध कॅम्प आयोजित करावेत, अशा सूचना दिल्या. पेणसह रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी आगार व कार्यशाळांमधील चालक, वाहक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत एक्स-रे कॅम्प आयोजित करण्याचे आदेश दीपक घोडे यांनी दिले आहेत. जिल्हा क्षयरोग विभाग यांनी संपूर्ण जिल्ह्यातील चालक व वाहकांनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.