पालिकेच्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाचा आरंभ
१३५ शाळांमधील १८ हजारांपेक्षा अधिक मुलांना फायदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने विकसित झालेल्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाचा आरंभ पालिकेच्या १३५ शाळांमध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या उपक्रमामुळे शिक्षण विभागातील नवीन संकल्पनांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकणार आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, संपर्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर, संपर्क फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. राजेश्चर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका मुख्यालयात आज या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे, संपर्क दूरदर्शन संचाचे अनावरण करण्यात आले.
संपर्क फाउंडेशनचा हा उपक्रम देशातील आठ राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. एक कोटी ८० लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. महाराष्ट्रात १३ हजार शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आहे. पालिकेच्या परळ, दादर, भायखळा, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, कुर्ला, सांताक्रूझ, गोरेगांव आणि बोरिवली येथील मिळून एकूण १३५ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांच्या क्षमतांचा विकास करणे, अध्यापन पद्धती सोपी करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
२०० शिक्षकांना प्रशिक्षण
या उपक्रमात प्रत्येक शाळेसाठी एलईडी टीव्ही संच, २७३ दूरदर्शन संच, शिक्षकांसाठी स्मार्ट शाळा ॲप्लिकेशन, पाठ योजना, पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित २,७०० व्हिडिओ, मूल्यमापनासाठी वस्तुनिष्ठ प्रकारातील ३० हजार प्रश्न आदी शैक्षणिक बाबींचा समावेश आहे. यासाठी महापालिकेच्या २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.