कर्जतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू
‘दैनिक सकाळ’च्या बातमीचा इम्पॅक्ट
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे अखेर पुन्हा सुरू झाले असून सुरक्षेला बळ मिळाले आहे. २९ जुलै रोजी ‘दैनिक सकाळ’मध्ये कर्जत शहरात सुरक्षेचे तीन तेरा या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित केले.
मागील वर्षभरापासून कर्जत शहर बचाव समिती सतत या प्रश्नावर पाठपुरावा करत होती. समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी नगर परिषदेला इशाराही दिला होता. पूर्वी सीसीटीव्ही देखभालीचे काम पुण्यातील कंपनीकडे होते, मात्र त्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रणाली बंद पडली होती. या वेळी हे काम स्थानिक दिघे इंटरनेट सर्व्हिस कंपनीकडे देण्यात आले असून, स्थानिक तरुणांच्या प्रयत्नातून अल्पावधीत २८ पेक्षा अधिक कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उच्च गुणवत्तेचे कॅमेरे बसवले आहेत. याचा पोलिस तपासात फायदा होणार आहे. दरम्यान, नवे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर शहरातील अनेक समस्यांवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
निधीअभावी प्रकल्प रखडला
भविष्यात कर्जत शहरात एकूण १७० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार आहे. स्थानिक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, योजना तयार आहे, मात्र निधीअभावी प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. हे कॅमेरे बसवल्यास शहर सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.