छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा पहिला उल्लेख कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत (1665-1670) या ग्रंथात आढळतो.
त्यानंतर जेधे शकावली आणि जोधपूरच्या कुंडलीतही महाराजांच्या जन्माची नोंद आहे. यापैकी जोधपूर नोंदीवर आधारीत शिवरायांची कुंडली काढण्यात आली होती.
ही कुंडली पंडित शिवराम ज्योतिषी यांनी बनवली होती, तो शिवरायांचा समकालीन जोतिषी होता.
जोधपूरच्या कुंडली संग्रहात 600 हस्तलिखित कुंडल्या होत्या, ज्यामध्ये ही कुंडली सापडली होती.
पुण्यातील पंडित रघुनाथ शास्त्री यांना जोधपूर येथील पंडित मिठालाल व्यास यांच्याकडे कुंडली संग्रह असल्याचं समजलं. पण त्यांनी ह्या कुंडल्या राजपुताना संग्रहालयाचे सुपरीटेंडन्ट ओझा यांच्याकडे दिल्या होत्या.
त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळाने राजपुताना संग्रहालयाचे सुपरिटेंडेंट रायबहादूर गौरीशंकर हरी ओझा यांच्याकडून ही कुंडली मिळवली होती.
खरं तर कुंडलीपेक्षा शिवरायांचे कर्तृत्व आणि योगदान अधिक महत्त्वाचे आहे. पण ही कुंडली म्हणजे शिवरायांशी संबंधित अनमोल ठेवा आहे.