Hardik Pandya – Irfan Pathan : हार्दिक पंड्यामुळे इरफान पठाणला मोठा धक्का ? IPL कॉमेंट्रीचा वाद काय ?
Tv9 Marathi August 16, 2025 06:45 PM

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणचे नाव वगळण्यात आलं होतं, तेव्हा काही क्रिकेटपटू इरफानवर नाखूष असल्याची बातमी पसरली. त्यामध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे समोर आली होती, पण सत्य काही वेगळेच होते. आणि त्याचाच खुलासा खुद्द इरफान पठाणने एका मुलाखतीदरम्यान केला. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यामुळे इरफान पठाणला आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, अद्याप याची पुष्टी होऊ शकली नाही.

कॉमेंट्री पॅनेलमधून का हटवलं ?

रिपोर्ट्सनुसार, या हंगामात इरफान पठाणला कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याच्या कहाणीला खरंतर आयपीएल 2024 पासून सुरूवात झाली. तेव्हा रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आलं. यामुळे हार्दिकवर बरीच टीका झाली. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली नव्हती. या काळात इरफान पठाणने हार्दिक पंड्यावर बरीच टीका केली होती. त्यानंतर टीम इंडियाने त्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकला आणि हार्दिकचे नशीब बदलले. मात्र आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी इरफान पठाणला कमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अशा अनेक बातम्या समोर आल्या की अनेक खेळाडू इरफानवर नाखूष आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याचे नावही समाविष्ट होते.

काय म्हणाला इरफान पठाण ?

एका मुलाखतीदरम्यान इरफान पठाण म्हणाला की त्याने कधीच हार्दिक पंड्यावर टीका केली नाही. “आयपीएलमध्ये 14 सामने असतात, त्यापैकी 7 सामन्यांमध्ये जरी मी टीका केली असेल तरी मी सौम्यपणे वागतो. म्हणजेच, मी खूप हलका हात ठेवला. तुम्ही 14 वेळा चुका केल्या, पण मी फक्त 7 वेळा टीका केली, हे आमचे काम आहे” असं माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला. आयपीएल 2024 दरम्यान, मी लाईव्ह सामन्यादरम्यान म्हटले होते की मित्रा, तू टीका कर, जर खेळाडू वाईट वागला तर तू ते कर. तेव्हा माझ्या शेजारी रवि शास्त्री आणि जतीन सप्रू उभे होते. मला विचारण्यात आले की सध्या जे वातावरण आहे आणि त्यावर होत असलेल्या टीकेबद्दल तुमचे काय मत आहे? तेव्हा इरफान पठाण म्हणाला की, हार्दिक पंड्याबद्दल काही आक्षेपार्ह शब्द वापरले जात आहेत, आणि याच गोष्टीचा त्यांनी विरोध केला.

आम्ही केला सपोर्ट

“जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्यावर नक्कीच टीका होते. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूंवरही टीका झाली आहे. त्याने कधीही कोणालाही असे जाणवू दिलं नाही की ते खेळापेक्षा मोठे आहेत. परंतु मी पंड्याविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांच्या विरोधात होतो, असं इरफान पठाण म्हणाला. मुलाखतीदरम्यान इरफानला विचारण्यात आलं की तुझ्या आणि हार्दिक पांड्यामध्ये सर्व काही ठीक नाहीये का? यावर तो म्हणाला, “असं काहीच नाहीये. आमच्यात काही शत्रुत्व नाहीये. बडोद्याचे जे जे खेळाडू आहेतक, त्यापैकी कोणीच असं म्हणू शकत नाही की इरफान आणि युसूफ पठाणने त्यांना सपोर्ट केलं नाही. मग तो दीपक हुड्डा असो किंवा कुणाला पंड्या..” असंही इरफान म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.