विद्युतवाहक तार अंगावर पडून वृद्धेचा मृत्यू
महावितरणविरोधात ग्रामस्थांचा संताप; जांभिवलीत दुर्घटना
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः जांभिवली (ता. खालापूर) येथे विद्युतवाहक तार अंगावर पडून सुलोचना दत्ता गावडे (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १६) पहाटे घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी महावितरणच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता सुलोचना गावडे शौचासाठी घराबाहेर गेल्या असता अचानक खांबावरील विद्युतवाहक तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. या तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे त्यांना जोरदार झटका बसून जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील लोक धावले; मात्र पावसाच्या पाण्यातून विद्युत प्रवाह सुरूच असल्याने आणखी काही लोकांना किरकोळ झटका बसल्याचे सांगण्यात आले.
तत्काळ परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तेजस म्हात्रे यांनी रोहित्रातील वीजपुरवठा बंद केला. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार, तसेच महावितरण अधिकारी योगेश देसाई व माजी जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुलोचना गावडे यांचा मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर जांभिवली गावात शोककळा पसरली आहे.
ग्रामस्थांनी आरोप केला, की ३० वर्षांहून अधिक जुन्या विद्युत तारा असून, दुरुस्ती अथवा बदलाचे कोणतेही उपाय महावितरणने घेतलेले नाहीत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाल्यामुळे आज एका वृद्धेचा बळी गेला आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून जांभिवली ग्रामस्थ जुन्या तारा बदलण्याची मागणी करीत आहेत; पण दुर्लक्ष होतच राहिले. सुलोचना गावडे यांचा मृत्यू ही महावितरणच्या हलगर्जीची किंमत आहे. आता तरी महावितरणने जागे व्हावे, अशी प्रतिक्रिया जांभिवलीतील सुरेश गावडे यांनी दिली.