गुरुग्राम सेक्टर ५७ मध्ये एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार
दोन दुचाकीस्वारांनी दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या
सुदैवाने एल्विश यादव गोळीबाराच्या वेळी घरी नव्हते
पोलिसांनी पुरावे गोळा करून चौकशी सुरू केली
गुरुग्राम सेक्टर ५७ मध्ये राहणाऱ्या युट्यूबर एल्विश यादव यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. गोळीबारीची घटना पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. सुदैवाने एल्विश यादव त्यावेळी घरी नव्हता.
माहिती मिळताच पोलिसांचेपथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. कुटुंबाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याप्रकरणी माहिती देताना सांगितले. दरम्यान घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. दोन दुचाकीस्वार हल्लेखोर एल्विश यादवच्या घराकडे धावत आले आणि त्यांनी गोळीबार केला.
सीसीटीव्हीफुटेजमध्ये असे दिसून येते की, दोन हल्लेखोर त्यांची बाईक घरापासून काही अंतरावर उभी करतात. नंतर ते एल्विशच्या घराकडे धावतात आणि गोळ्या झाडतात. हल्लेखोरांनी हेल्मेट आणि कपड्याने आपले चेहरे लपवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकजण घराच्या गेटवर लटकून घराच्या आत गोळ्या झाडताना दिसताना दिसत आहे.
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी एल्विश यादवच्या घरावर दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. गोळ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर लागल्या.
एल्विश यादवच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगने घेतलीय आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आलाय. एल्विशनं सट्टेबाजीला प्रोत्साहन देऊन अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. याशिवाय या पोस्टमध्ये इतर लोकांनाही भाऊ गँगने धमक्या दिल्या आहेत.