वारसांना हक्काच्या नोकरीचा दिलासा
सहा महिन्यांत २८३ जण कायम सेवेत : आता जवळच्या प्रभागातच अर्ज करता येणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे महापालिकेने मेगा भरतीच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीची संधी देण्याची मोहीम गतीने सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांत २८३ वारसांना कायम नोकरीवर नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. सुमारे सातशे जणांची या पद्धतीने नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यामध्ये मयत, सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलं, मुली, पत्नी अथवा पतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘हक्का’च्या या नोकरीसाठी वारसांना आता पालिका मुख्यालय गाठण्याची गरज भासणार नाही. प्रभागनिहाय विनंती, अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे.
ठाणे महपालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त, मयत किंवा ज्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क लागू होतो. त्याअंतर्गत ठाणे महापालिकेतही वारसा हक्क देण्याबाबत फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार तरतूद केली होती, पण शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर सुनावणी देताना जानेवारीमध्ये न्यायालयाने ही स्थगिती उठवली. परिणामी सामाजिक न्याय व वित्त मंत्रालयाने सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये ठाणे महापालिकेतही वारसा हक्काने नियुक्ती करण्यात येत आहे.
ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवत कर्मचाऱ्यांच्या वारसांना हक्काची नोकरी देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासूनचा हा बॅकलॉग भरून काढण्यात येत असल्यामुळे सुमारे ७०० ते ८०० नवीन सफाई कर्मचारी वारसा हक्काने पालिकेच्या अस्थापनेवर रुजू होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे २८३ वारसांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे; मात्र उर्वरित वारसदार रोज पालिका मुख्यालयात अर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वारस गर्दी करत आहेत. अर्ज, पडताळणी, छाननी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे पाठपुराव्यासाठी या वारसांना खेटा माराव्या लागत आहेत.
प्रभाग स्तरावर अर्जाची सोय
आधी वारसांना नियुक्तीसाठी थेट महापालिका मुख्यालयात अर्ज करावा लागत होता, मात्र आता ही प्रक्रिया प्रभाग समिती कार्यालयांतूनच करता येणार आहे. अर्ज, छाननी आणि पडताळणी प्रभाग स्तरावर पूर्ण होणार असून, अंतिम मंजुरीसाठी फाईल मुख्यालयात पाठवली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी दिली.
७०० हून अधिक नियुक्त्यांचा अंदाज
अद्यापही सुमारे ४५० ते ५०० अर्जांची प्रक्रिया सुरू असून, एकूण ७०० ते ८०० वारसांना नोकरी दिली जाण्याची शक्यता आहे. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पारदर्शकतेने आणि गतिमानपणे राबवली जात आहे.
नियुक्तिपत्र हातात
ठाणे महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा महिन्यांत २८३ जणांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची मुले, मुली, पत्नी किंवा पतीचा समावेश आहे. मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झाली. २० मार्चला ३२ वारसांना कायम नोकरीत घेण्यात आले. ९ एप्रिलला ३९ त्यानंतर टप्प्याटप्प्याने वारसांना कायम नोकरीत सामावून घेण्यात आले. ही प्रक्रिया केवळ सामाजिक न्यायाची पूर्तता नाही, तर कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलेला न्यायदेखील आहे. नियुक्तिप्राप्त वारसांना आता आयुष्याला नवी दिशा मिळाली असून, इतर प्रलंबित अर्जदारांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोहिमेची आकडेवारी
तारीख नियुक्ती संख्या
२० मार्च ३२
९ एप्रिल ३९
३ मे ४५
३ जून ३९
२९ जुलै ६९
१४ ऑगस्ट ५९
एकूण २८३