Crime News: पैशांसाठी धाकट्या भावाचा खून, आरोपीला जन्मठेप
esakal August 18, 2025 04:45 PM

छत्रपती संभाजीनगर : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये दे म्हणत धाकट्या भावाची चाकू भोसकून खून केल्याची घटना जुलै २०२० मध्ये घडली होती. या प्रकरणात आरोपीला जन्मठेप आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी गुरुवारी (ता. १४) ठोठावली.

सदर प्रकरणात मृत ॲड. सूर्यप्रकाश रामनाथ ठाकूर (५३, रा. अशोकनगर, गारखेडा परिसर) यांची पत्नी आशा सूर्यप्रकाश ठाकूर यांनी तक्रार दिली होती. सूर्यप्रकाश यांचा मोठा भाऊ वेदप्रकाश रामनाथ ठाकूर (वय ५८, रा. यशवंतनगर, पैठण) आर्थिक अडचणीमुळे पैशांची मागणी करत होता.

घटनेच्या काही महिन्यांपूर्वी त्याने बिडकीन येथील प्लॉट विकून पैसे दे, नाहीतर जीव घेईन, अशी धमकी सूर्यप्रकाश यांना दिली होती. दरम्यान, २४ जुलै २०२० रोजी सकाळी साडेआठ वाजता वेदप्रकाश भावाच्या घरी आला. त्याने घर घेण्यासाठी दोन लाखांची मागणी केल्याने वाद झाला. त्यानंतर धारदार हत्याराने सूर्यप्रकाश यांच्यावर वार केले.

हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. रक्तबंबाळ अवस्थेत सूर्यकांत यांना खासगी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत दरड कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

न्यायालयात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे आणि सूर्यकांत सोनटक्के यांनी २७ जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीअंती न्यायालयाने वेदप्रकाश ठाकूर याला दोषी ठरवून जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार जे.बी. दीक्षित, अंमलदार दसरे यांनी काम पाहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.