सुनील जाधव, कल्याण टीव्ही 9 मराठी : कल्याण पूर्वमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महेश गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. आता महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. ज्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू केल्याने त्यांच्या राजकीय भविष्याबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना महेश गायकवाड यांनी थेट प्रवेशावर भाष्य करणे टाळले. “कल्याण पूर्वेतील विकासकामांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया महेश गायकवाड यांनी दिली, मात्र, त्यांच्या या भेटीमुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये महेश गायकवाड यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणं काय?कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक चार प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे स्थानिक नेत्यांसाठी मजबूत पक्षीय पाठबळ असणे आवश्यक आहे. याच कारणामुळे महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे शिवसेनेत प्रवेशाची पायाभरणी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महेश गायकवाड शिंदे गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांची ही भेट केवळ विकासकामांपुरती मर्यादित होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या भेटीमागे काही राजकीय हेतू दडलाय का, असा सवालही राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित होत आहे.
कल्याणमधील राजकीय वर्तुळाचे लक्षमहेश गायकवाड हे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर जोरदार चर्चेत आले होते. त्या प्रकरणातही राजकीय संबंध आणि अंतर्गत गटबाजीची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाल्याने कल्याणच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यासोबतच महेश गायकवाड पुढील काळात कोणते पाऊल उचलतात, याकडे कल्याणमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान महेश गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिंदे गटातील संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कल्याण पूर्वेतील भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये या भेटीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधी अनेक राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.