गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊससक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत रविवारीदेखील मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्याचाच प्रभाव म्हणून पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नांदेड- जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर असून लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ गावात नदीचं पाणी शिरलंय. रावनगाव इथं अंदाजे 225 नागरिक पाण्यात अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. NDRF कडून बचावकार्य सुरू आहे.
नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकलं आहे. पाण्याची आवक सुरूच असून पुराचा धोका वाढला आहे. विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले आहेत आणि 64 हजार 412 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तासाभरात अजून दोन दरवाजे उघडले जाणार आहेत.
बुलढाणा- पैनगंगा नदीच्या पुरात होणार मोठी वाढ आणि नदीक्षेत्रात पडत असलेला सततचा मुसळधार पाऊस यामुळे पेनटाकळी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. हा प्रकल्प 84.38 टक्के भरल्यानं तसंच सतत आवक होत असल्यानं प्रकल्पाची 9 द्वारं 30 सेंटीमीटरने उघडून त्यातून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ठाणे- मुसळधार पावसाचा ठाणे ते बोरिवली, मिरारोड, वसई, गुजरात महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना बसला आहे. गायमुख घाटानंतर आणि वर्सोवा ब्रिजच्या अलीकडे छोट्या-मोठ्या गावांबाहेरील रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
सांगली- शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांत 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चांदोली धरण 91.80 टक्के भरलं आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात साडेसहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जळगाव- रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला पूर आला आहे. शेतातील केळीचं पिक अक्षरशः पावसामुळे वाहून गेलंय. रामजीपुरातील मारुती मंदिर पाण्याखाली गेला आहे.
चिपळूण- सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील जुना बाजारपूल परिसरात नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. घाट माथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.