Mumbai on Red Alert : मुंबईकरांनो, घराबाहेर पडताना विचार करा… मुंबईसाठी पुढचे 48 तास धोक्याचे, रेड अलर्ट जारी…
Tv9 Marathi August 19, 2025 01:45 AM

मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर राज्यात वाढला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता मुंबईमध्ये मोठा अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसाठी पुढील 48 तास धोक्याची आहेत. मुंबईमध्ये 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी अति महत्वाचे काम असल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले असून रस्त्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवी मुबंईत पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत संततधार पावसामुळे चुनाभट्टी रेल्वे स्टेशन,
समर्थ नगर, भक्ती धाम रोड, धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, वि.एन.पूर्व मार्ग, स्वदेशी मिल कामगाराच्या घरात पावसाचे पाणी साचले आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागातील तारापूर चिंचणी भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पालघर जिल्ह्यातील भात रोपण्या पूर्ण झाल्या असून भात पिकांना उभारी देणारा पाऊस सध्या पडत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईतील वीरा देसाई येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई कंट्री क्लबसमोरील रस्त्यावर पाणी साचले आहे. संपूर्ण रस्ता पाण्यात बुडाला आहे. सकाळपासून पावसाचा फटका ठाणे ते बोरीवली, मिरा रोड, वसई,गुजरात महामार्गावरती जाणाऱ्या वाहनांना बसला आहे. गायमुख घाटानंतर आणि वर्सोवा ब्रिजच्या अलीकडे छोट्या-मोठ्या गावाच्या बाहेर रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

#MumbaiRains #mumbailocal #mumbailocaltrain #WaterloggingMumbai pic.twitter.com/F8Dt22M0lB

— Azeem☆☆☆☆Tamboli》》》》 (@amazingazim)

करपे कंपाऊंडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक विभागाकडून पाण्यात अडकलेल्या रिक्षा असेल इतर वाहना काढण्याचे काम सुरू आहे. ज्या रस्त्यावरती खड्डा आहे त्या ठिकाणी वाहतूक विभाग पोलीस कर्मचारी उभे आहेत जेणेकरून कुठलीही गाडी त्या खड्ड्यातून जाता कामा नये, याची काळजी वाहतूक विभाग घेत आहे. या डोंगराळ आणि खाडी किनारी असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

आज पालघर आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट बाकी कोकणातील ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय. उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय.मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. एका मागे एक लोकल गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. सायन माटुंगा दरम्यान लोकल गाड्या थांबल्या आहेत. चाकरमानी वर्ग आता माटुंगा हून रेल्वे ट्रॅक वर चालत दादर स्थानक गाठत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.