‘शेती उत्तम असल्यानेच मोठ्या संधी’
रत्नागिरी, ता. १८ : आत्ताच्या पिढीने उत्तम शेती, व्यापार दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ असे पूर्वीचे चित्र पुन्हा आणण्याची गरज आहे. शेतीमध्ये विविध संधी आहेत. शेतीमध्ये सुशिक्षित विद्यार्थ्यांची गरज आहे. शेतीची संशोधनाशी सांगड घालून समाजाला त्याचा उपयोग होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी प्रथमेश साठे यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन कार्यक्रमात कृषिक्षेत्रामध्ये रसायनशास्त्राचे महत्त्व या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचेही उद्घाटनही करण्यात आले. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी, माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख आणि इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टचे सदस्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.