झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
esakal August 20, 2025 06:45 AM

कासा, ता. १९ (बातमीदार) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याने भरल्याने वाहनचालकांचे हाल होत असून नागरी वाहतूक ठप्प झाली आहे.

डहाणू स्थानकावरून किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बडबडे हॉस्पिटलसमोर मंगळवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास एक झाड कोसळून दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच डहाणू नगर परिषदचे कर्मचारी जेसीबी व आवश्यक साधनांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जवळपास चार ते पाच तास प्रयत्न करून झाडाचे तुकडे कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अखेर मोठ्या कष्टांनी कोंडी सोडवण्यात यश आले.

सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शहरातील नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने अधिक सतर्क राहून पर्जन्यकालीन यंत्रणा तत्पर ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.