नांदगाव: तालुक्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या सत्तर टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेले पावसाचे पुनरागमन नांदगाव तालुक्यासाठी खूपच दिलासादायक ठरले आहे. क्वचित भरणारे नाग्यासाक्या, माणिकपुंज धरण तुडुंब भरले आहे. त्यापाठोपाठ आता मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. एकूणच तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे.
विविध गावातील लहान मोठे पाझर तलावांना पाणी खेळू लागले असून मात्र आज सकाळपासून पावसाचा वेग ओसरून दुपारी कडक उन्हाने हजेरी लावली. तालुक्यातील मन्याड खोऱ्यातील परिसराला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढल्याने मध्यम प्रकल्पातील माणिकपुंज धरण आता
ओसंडून वाहत आहेत.
माणिकपुंज धरणाच्या वरच्या क्षेत्रात वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील नारळा पारळा भादली ,येथील नदीवर बांधलेल्या ७५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मन्याड प्रकल्पातून आठवड्यात रोज १५०० क्युसेसने मन्याड नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्याने तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाल्याने चार दिवसापासून मन्याड नदीचे पात्र ओसंडून वाहत आहे.
हे वाहत जाणारे पाणी पुढे लगतच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणात जाऊन मिळत असल्याने या धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन चाळीस टक्याएवढं जलसंचय त्यातून झाला आहे. माणिकपुंज धरणातून १९०० दशलक्ष घनफूट एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने माणिकपुंज पाठोपाठ मन्याड धरणाची वाटचाल ५० टक्क्याएवढी झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हे धरण देखील भरणार आहे.
रब्बीला फायदा
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे लहानमोठ्या जलसाठ्यात पाण्याचा संचय झाला आहे. रब्बी हंगामाला त्याचा उपयोग होऊ शकतो. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणात अद्यापही पाण्याचा एक थेंब देखील पडला नाही. दहेगावच्या लाभक्षेत्रात वरच्या भागात पावसाने हजेरी लावूनही दहेगाव अद्यापही कोरडे आहे. त्याच्या वाटेत ३६ अधिक लहान लहान बंधारे बांधण्यात आल्याने दहेगाव धरणातील जलसाठा भरण्यासाठी मोठा कालावधी लागतो आहे.
Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगीपांझण खोऱ्याला दिलासा
पांझण खोऱ्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नाग्यासाक्या धरणातील साठ्यात वाढ होऊन हा साठा आता नव्वद टक्के एवढा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून उद्या दुपारपर्यंत पाणी नदीच्या दिशेने मुसंडी मारेल असा अंदाज आहे. मेमध्ये नाग्यासाक्या धरणाच्या वरील लाभक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने तेव्हाच धरणात तीस टक्क्याची वाढ झाली होती. गेल्या तीन दिवसातील पावसामुळे नाग्यासाक्या धरणातील एकूण साठ्यात वाढ होऊन आजमितीला ४८४ घनफूट एवढे जलसंचय झाले आहेत.