अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळापासून त्यांनी केलेल्या शांतता चर्चांचा, वाटाघाटींचा ते सातत्यानं उल्लेख करताना दिसत आहेत.
"मी सहा युद्धं संपुष्टात आणली आहेत आणि यातला एकही करार मी 'शस्त्रसंधी' हा शब्द न वापरता केला आहे," असं सोमवारी (18 ऑगस्ट) व्हाइट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी सांगितलं होतं.
यावेळी युरोपीय नेत्यांनी त्यांना शस्त्रसंधीची मागणी करण्याचा दबाव आणला होता, असं ते म्हणाले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या युद्धांची संख्या 'सात'पर्यंत वाढली होती.
ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की, 'शांतता प्रस्थापित करणाऱ्या' (पीसमेकर-इन-चीफ) ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा.
ट्रम्प यांनी कथितपणे संपवलेली युद्धांची यादीच दाखवली.
काही युद्धांमागे जुने वाद जरी होते, तरी अशी काही युद्धं फक्त काही दिवसच चालली होती. मात्र त्यांनी केलेले काही शांतता करार टिकतील की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.
ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर बोलताना अनेकवेळा 'युद्धबंदी' किंवा 'शस्त्रसंधी' हा शब्द वापरला.
बीबीसी व्हेरिफायने या युद्ध संघर्षांचा अभ्यास करून ट्रम्प यांना युद्ध संपवण्याचं खरं कितपत श्रेय देता येईल, हे तपासून पाहिलं आहे.
इस्रायल आणि इराण13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्यातून त्यांच्यात 12 दिवसांचं युद्ध सुरू झालं.
हल्ल्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्वतः माहिती दिल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.
अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रांवर हल्ले केले आणि त्यामुळे युद्ध लवकर संपेल असं मानलं जात आहे.
23 जून रोजी ट्रम्प यांनी पोस्ट केली की, "इराण अधिकृतपणे शस्त्रबंदी सुरू करेल, 12 तासांनी इस्रायलही शस्त्रसंधी करेल आणि 24 तासांनी 12 दिवसांचं युद्ध संपल्याचं जग जाहीरपणे मान्य करेल."
युद्ध थांबल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनी म्हणाले की, त्यांच्या देशाने 'निर्णायक विजय' मिळवला आहे. त्यांनी शस्त्रसंधीचा उल्लेख मात्र केला नाही.
यानंतरही इस्रायलने सूचक इशारा दिला की, नवीन धोके टाळण्यासाठी ते पुन्हा इराणवर हल्ला करू शकतात.
ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशन थिंक टँकचे वरिष्ठ तज्ज्ञ मायकेल ओ'हॅनलॉन यांनी युक्तिवाद केला की, "कायमस्वरूपी शांततेबाबत किंवा इराणच्या आण्विक कार्यक्रमावर पुढे कसं लक्ष ठेवायचं, याबद्दल अद्याप कोणताही करार झालेला नाही."
"म्हणजे खरं पाहिलं तर युद्ध संपलं असं नाही, तर जास्त करून तात्पुरती युद्धबंदी झाली आहे. तरीही काही श्रेय ट्रम्प यांना देता येईल, कारण अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने इराणला कमकुवत केलं आणि त्याला धोरणात्मक किंवा रणनीतिक महत्त्व आहे."
पाकिस्तान आणि भारतया दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे, परंतु मे महिन्यात भारत प्रशासित काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष सुरू झाला.
चार दिवसांच्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी पोस्ट केली की, भारत आणि पाकिस्तानने 'पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी' मान्य केली आहे.
"अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या एका रात्रीच्या चर्चेचं हे फलित आहे," असं त्यांनी सांगितलं होतं.
पाकिस्तानने ट्रम्प यांचे आभार मानले आणि नंतर त्यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारसही केली. शिफारशीचं कारण देताना त्यांच्या 'निर्णायक मुत्सद्देगिरीच्या हस्तक्षेपाचा' उल्लेख केला.
मात्र, भारताने अमेरिकेच्या सहभागाची चर्चा नाकारली. "लष्करी कारवाई थांबवण्याबाबतच्या चर्चा भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट, दोन्ही देशांच्या लष्करांमधील आधीपासून असलेल्या मार्गांद्वारे झाल्या," असं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्टपणे सांगितलं.
रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोरवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या दोन देशांमधील जुना तणाव पुन्हा वाढला, जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला एम 23 बंडखोर गटाने पूर्व डीआर काँगोमधील खनिजांनी समृद्ध भाग आपल्या ताब्यात घेतला.
जूनमध्ये या दोन देशांनी वॉशिंग्टनमध्ये शांतता करार केला, ज्याचा उद्देश अनेक दशकांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपवणे हा होता. यामुळे त्यांचा आणि अमेरिकेचा व्यापार वाढेल, असं ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.
या मजकुरात रवांडा आणि डीआर काँगो यांनी ऑगस्ट 2024 मध्ये मान्य केलेल्या 'शस्त्रसंधीचा सन्मान राखावा' अशी मागणी करण्यात आली.
अखेरच्या करारानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, एम 23 बंडखोर, जे रवांडाशी जोडले जातात, त्यांनी शांतता चर्चेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात इतिहास शिकवणाऱ्या प्राध्यापक मार्गारेट मॅकमिलन म्हणतात, "काँगो आणि रवांडा यांच्यात अजूनही लढाई सुरू आहे. त्यामुळे शस्त्रसंधी खरं कधी झालीच नाही."
थायलंड आणि कंबोडिया26 जुलै रोजी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केलं की, "मी थायलंडच्या प्रभारी पंतप्रधानाशी लगेच संपर्क साधत आहे आणि युद्धबंदी आणि सध्या सुरू असलेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी विनंती कॉल करत आहे."
काही दिवसांनंतर, सीमेवरील सुमारे एक आठवड्याच्या लढाईनंतर, दोन्ही देशांनी 'तात्काळ आणि बिनशर्त शस्त्रसंधी' करण्यास सहमती दर्शवली.
मलेशियामध्ये शांतता चर्चा आयोजित करण्यात आली होती. परंतु ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध थांबलं नाही तर, अमेरिका टॅरिफ कमी करण्याच्या स्वतंत्र चर्चा थांबवेल, अशी धमकी दिली.
दोन्ही देश अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.
7 ऑगस्ट रोजी थायलंड आणि कंबोडियाने आपल्या सीमेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं एक करार केला.
आर्मेनिया आणि अझरबैजानदोन्ही देशांच्या नेत्यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, असं सांगितलं. कारण त्यांनी 8 ऑगस्ट रोजी व्हाइट हाऊसमध्ये जाहीर झालेल्या शांतता करारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
"माझ्या मते, त्यांना इथे चांगलं श्रेय दिलं जातं, ओव्हल ऑफिसमधील स्वाक्षरी समारंभ कदाचित पक्षांना शांततेकडे ढकललं असेल," असं ओ'हॅनलॉन म्हणतात.
नागोर्नो-काराबाखच्या स्थितीवर केंद्रित असलेला सुमारे 40 वर्षांचा संघर्ष संपवायला तयार आहोत, असं दोन्ही बाजूच्या सरकारांनी मार्चमध्ये सांगितलं होतं.
सर्वात अलीकडील गंभीर संघर्ष सप्टेंबर 2023 मध्ये झाला होता. त्यावेळी अझरबैजानने त्या भागावर कब्जा केला, तिथे अनेक एथनिक आर्मेनियन राहत होते.
इथे ट्रम्प यांना युद्ध संपवण्यासाठी कोणतं 'युद्ध'च नव्हतं, पण नाईल नदीवरील धरणामुळे दोन्ही देशांमध्ये जुना वाद आहे, त्यामुळे दोन्ही देशात तणाव आहे.
इथिओपियातील ग्रँड इथिओपियन रेंसॉन्स धरण या उन्हाळ्यात पूर्ण झाले. या धरणामुळे नाईल नदीतील पाण्यावर परिणाम होऊ शकतो, असं इजिप्तचं म्हणणं आहे.
12 वर्षांच्या मतभेदानंतर, 29 जून रोजी इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इथिओपियासोबतची चर्चा ठप्प झाल्याचं सांगितलं.
ट्रम्प म्हणाले होते की, "मी जर इजिप्तमध्ये असतो, तर मला नाईलच्या पाण्याची गरज भासली असती." त्यांनी आश्वासन दिलं की, अमेरिका ही समस्या लवकरच सोडवेल.
इजिप्तने ट्रम्प यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. परंतु इथिओपियाचे अधिकारी म्हणाले की, यामुळे तणाव आणखी वाढू शकतो.
इजिप्त आणि इथिओपियामध्ये अजूनही मतभेद दूर करण्यासाठी कोणताही औपचारिक करार झालेला नाही.
सर्बिया आणि कोसोवो27 जून रोजी ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांनी सर्बिया आणि कोसोवो यांच्यात युद्ध टाळलं आहे. ते म्हणाले, "सर्बिया आणि कोसोवो मोठ्या युद्धाला सज्ज होते. मी म्हटलं, तुम्ही लढाल तर अमेरिकेसोबतचा तुमचा व्यापार बंद होईल. मग ते म्हणाले, कदाचित आम्ही लढणारही नाही."
या दोन्ही देशांमध्ये जुने वाद आहेत. 1990च्या दशकातील बाल्कन युद्धांचा परिणाम आणि अलीकडच्या वर्षांत तणाव वाढत आहेत.
प्रा. मॅकमिलन आम्हाला म्हणाल्या, "सर्बिया आणि कोसोवो एकमेकांशी लढत नाहीत किंवा गोळीबारही करत नाहीत, त्यामुळे त्यांचं युद्ध संपवायचा प्रश्नच नाही."
व्हाइट हाऊसने आमचं ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधलं.
दोन्ही देशांनी 2020 मध्ये ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या उपस्थितीत आर्थिक सहमती करार केले होते. पण त्या वेळी युद्ध सुरू नव्हते.
(पीटर मवाई, श्रुती मेनन आणि इव्ह वेबस्टर यांचं अतिरिक्त वार्तांकन.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.