मिठी नदीलगतचे रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
esakal August 21, 2025 01:45 PM

मिठी नदीलगतचे रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
क्रांतिनगर, संदेशनगरमध्ये भीतीचे वातावरण
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. २० (बातमीदार) ः मुसळधार पावसामुळे मिठी नदीलगतच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, सरकारने लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. क्रांतिनगर, संदेशनगरमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याने अनेकदा पावसाळ्यामध्ये येथील रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते. १८ आणि १९ ऑगस्टला झालेल्या पावसामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील क्रांतिनगर, संदेशनगर, सोनापूर ही मिठी नदीच्या शेजारी मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. ही झोपडपट्टी मिठी नदीजवळ काही अंतरावर व खोलगट भागात आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की नागरिकांच्या घरात शिरते. अचानक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास क्रांतिनगर, संदेशनगर, सोनापूर गल्ली, संयोगनगर, सहकारनगरमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने क्रांतिनगरमधील ४५०, संदेशनगरमधील १५० झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसराला भेट दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय तुर्डे, आमदार दिलीप लांडे यांनी पालिकेच्या मदतीने कुर्ला येथील पालिकेच्या मगन नथुराम मार्ग पालिका शाळा व शिशू विकास शाळेत ६०० नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले. तर काही रहिवाशांनी आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवत असून, सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. यापूर्वी या परिसरातील तीन हजार ५०० कुटुंबांचे पुनर्वसन प्रीमियर कॉलनी येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आमचेही त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मिठी नदीच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे दरवर्षी हाल होत आहेत. येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यांनी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे.
- संजय तुर्डे,
माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गट

मिठी नदीच्या पातळीत वाढ झाली की आम्हाला धोक्याची सूचना दिली जाते. आम्हाला स्थलांतरित केले जाते, मात्र कायमस्वरूपी पुनर्वसन केले जात नाही.
- सिंधू काळे, रहिवासी

नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घर खाली करावे लागते. या नागरिकांचे त्वरित कोहिनूर या ठिकाणी स्थलांतर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू.
- अशोक कांबळे, भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.