ज्वारी उकडी पान मोदकाची बाजी
यंग स्टार्स ट्रस्टच्या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद
विरार, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सव जवळ येऊ लागला असून, आता घराघरात मोदक बनविण्याबाबत चर्चा रंगत आहेत. यावर्षी गणपतीला कोणते मोदक बनवायचे, यावर मते घेतली जात असतानाच यंग स्टार ट्रस्टतर्फे रविवारी (ता. १७) आयोजित मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत आशा म्हात्रे यांनी सादर केलेले ज्वारी उकडीचे पान मोदक सर्वोत्तम ठरत पहिले स्थान पटकावले.
मोदक स्पर्धेत अननसाचे मोदक, ओली हळदी, शेंगदाणा, पंचरूची मोदक शतावरी, नागवेल पान, बीटरूट, दुधी, बेलाचे पान ड्रॅगन फ्रूट, ज्वारी उकडी पान मोदक असे अनेक पौष्टिक प्रकार पाहायला मिळाले. दुधी, ओरिओ, शुगर फ्री मोदकांनी लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत अपर्णा कडू यांच्या वनरंग मोदकांनी द्वितीय क्रमांक तर चैताली पाटील या शतावरी मोदक (तृतीय), प्रीती पालकर यांच्या ड्रॅगन फ्रूट-सीताफळ मोदक आणि लक्ष्मी लेंगरे यांच्या पंचरूची मोदकाला उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. विवा काॅलेजमधील नम्रता खारकंडी, सिद्धेश वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
जुने विवा काॅलेजमध्ये उखाणे स्पर्धा आयोजित केली होती. राजकीय, सामाजिक पारंपरिक यापैकी कोणतेही दोन उखाणे घ्यायचे होते. बाहेर वातावरणात वाढलाय उष्मा, घरी मागवला गारेगार फंटा, अन्.... माझी प्रीती झिंटा असे विविध उखाणे घेत महिलांनी आनंद लुटला. ज्युनियर कॉलेजच्या स्मिता सावे यांनी परीक्षण केले. अनुष्का घाडीगावकर यांना प्रथम, द्वितीय स्थानी हर्षा नाईक, तर मालती भटवलकर तृतीय आणि उत्तेजनार्थ ममता बाणे, उत्तेजनार्थ अंजली कदम यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणावेळी ज्येष्ठ समाजसेवक किरण ठाकूर, नगरसेविका रिटा सरवैया, ॲड. नयन जैन, राजेश बक्षी, मुग्धा लेले, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, मिलिंद पोंक्षे, भूषण चुरी यांनी उपस्थित होते.