सुंदर जगा, सुंदर दिसा
esakal August 21, 2025 03:45 PM

झोपेतून जागी होतच होते, इतक्यात फोनची रिंग वाजली, कमलताईंचा फोन होता. ‘मला चक्कर येतीये, पाय सुजले आहेत. मी आज येणार नाही,’ असं त्या म्हणाल्या. खरतर उगाचच अजिबात सुट्टी न घेणाऱ्या कमलताईंच्या आवाजात त्यांना होणारा त्रास जाणवत होता. मी त्यांना म्हटलं, ‘काळजी घ्या आणि डॉक्टरकडे जाऊन या.’

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आल्या; पण तरीही म्हणावं तसा तजेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसेना. खूप दिवस त्यांना त्यानंतरही बरं वाटत नव्हतं; पण मला एकटीला जड जाईल म्हणून थोडं का होईना रोज कामाला येत राहिल्या. आव्हानं पेलणं हे स्त्रीमध्ये अंगभूत असतं. जीवात जीव असेपर्यंत इतरांसाठी करत राहणं हे तिला तिचं कर्तव्य वाटतं. खरंतर आमच्या कमलताई घरी आल्या, की मला हायसं वाटतं. शांत स्वभाव, समाधानी वृत्ती, प्रचंड उत्साह या सकारात्मकतेमुळे आमची रोजची सकाळ प्रसन्न होते.

त्या तीन-चार तास असेपर्यंत माझ्या अंगातही कामाचा उत्साह सळसळत असतो. जणू काही त्या मला ऊर्जा देण्यासाठीच येतात. म्हणूनच कधी त्या आल्या नाहीत, तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. या कमलताईंसारखीच ‘ती’असते, म्हणून घर असतं.

सुशिक्षित असो, की अशिक्षित बाई एकटीच्या हिमतीवरही घराची जबाबदारी लीलया पेलवू शकते, मुलांचं आयुष्य घडवते. कुठून येते ही ऊर्जा? ही शक्ती? खरंतर तिच्यात असतं हे सगळं. संवेदनशीलता, सृजनशीलता, कलात्मक दृष्टिकोन हे तिला मिळालेलं वरदानच आहे.

उगाचच तिच्यामुळे घराला घरपण येत नाही. मला स्त्री म्हणून जन्म घेतला हे अभिमानास्पद वाटतं. एवढं वैविध्यपूर्ण आयुष तिचंच असत. वेगवेगळ्या भूमिका जगताना, आयुष्याचे विविध अंग अनुभवता, अगदी नटताना थटताना तिचा उत्साह अनोखा असतो.

तिची आभा टिकण्यासाठी स्वतःला प्राधान्य मात्र तिनं द्यायला हवं, असं मला मनापासून वाटतं. तिला आवडतात त्या गोष्टी हक्कानं तिनं करायला हव्यात. याबाबतीतली जागरूकता तिच्यामध्ये यायला हवी. माझ्या युट्यूब चॅनेलवर चेहऱ्याची, केसांची काळजी घेताना मनाची आणि आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे, याची आठवण मी सतत करून देत असते.

नटणं हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यासाठी सणवार, कार्यक्रम, लग्न, मुंज याची आपण आतुरतेने वाट बघतो. कारण छान दिसणं आपल्याला आवडतं. रोजच्या आयुष्यात आकर्षक दिसावं यासाठी मेकअपबाबतचं ट्युटोरियल मी माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आपलं बाह्यरूपही आपल्या मनाला उत्साह देत असतं.

त्यामुळे त्याची तेजस्विता कशी टिकवायची हे आपल्याला कळलं पाहिजे. अगदी रोज संपूर्ण मेकअप करायची गरज नाही. परंतु हलकासा मेकअप करून जर तुम्हाला ताजतवान वाटणार असेल तर काय हरकत आहे. या गणेशोत्सवासाठी खूप बटबटीत मेकअप न करता अगदी साधा रोजचा मेकअप. म्हणजे ‘केलाय की नाही’ असं वाटणारा मेकअप करण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा.

१. मेकअप करण्यासाठी फाउंडेशनचा बेस असणं गरजेचं नाही. त्यासाठी चेहरा खराब होणार नाही, म्हणून टिंटेड सनब्लॉक किंवा बीबी क्रीम वापरावं.

२. नैसर्गिकरित्या सुंदर आयब्रोज असतील, तर काहीच करायची गरज लागत नाही; पण तरीही हलकासा आयब्रो ब्रश फिरवला, तर रेखीवपणा येईल.

३. आजकाल मार्केटमध्ये टिंटेड लिक्विड प्लस आणि लिपस्टिक आलेल्या आहेत. त्या अगदी नैसर्गिक लूक देतात.

४. लिपस्टिक हा प्रत्येकाचा वेगळा चॉइस असला, तरीही २४ तास आपल्या ओठांवर टिकेल अशी लिपस्टिक लावली तरीही मेकअप केल्याचा लूक येतो.

५. चेहरा ‘फ्लॉ-लेस’ दिसावा आणि मेकअप केला नाहीये असं वाटावं यासाठी न्यूड लिपस्टिकचा वापर करावा.

६. ‘नो मेकअप लूक’मध्ये आयशॅडो न करता केवळ काजळ घालावं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.