कुठे रस्ते पाण्याखाली, कुठे नागरिकांचे स्थलांतर; पुणे, सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Tv9 Marathi August 21, 2025 03:45 PM

गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सातत्याने पडणाऱ्या पावसाने आता उसंत घेतली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई जवळील वसई-विरार शहरात ४८ तासांनंतरही अनेक भागांत पाणी साचले आहे. तसेच या ठिकाणच्या ४० सोसायटी गेल्या 3 दिवसांपासून पाण्याखाली आहे.

विरार शहरात गेल्या ४८ तासांपासून अनेक रस्ते पाण्याखाली आहेत. विरार स्टेशन ते बोळींज रस्त्यावर एक ते दोन फुटांपर्यंत पाणी जमा झाले आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे. तर सर्वात वाईट परिस्थिती युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये आहे. या ठिकाणच्या ४० सोसायट्या गेल्या आठ दिवसांपासून पाण्याखाली आहेत. तळमजल्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. ज्यामुळे ५०० हून अधिक कुटुंबांना आपली घरे सोडून नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे राहावे लागले आहे. एकेकाळी गजबजलेला हा परिसर आता पूर्णपणे शांत झाला असून, सर्वत्र फक्त पाणीच दिसत आहे.

सांगली, नाशिक आणि पंढरपूरमधील पूरस्थिती

सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कृष्णा नदीची पातळी ४२ फुटांवर पोहोचल्याने सांगली शहरातील अनेक सखल भागांत पाणी शिरले आहे. सांगलीतील मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट आणि कुरने वस्ती या भागांतील १५० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बायपास रोडवरील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर सांगलीतील बायपास रोडवर नागरी वस्ती भागात पाणी आले आहे. त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. सध्या या भागात हळूहळू पाणी वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये गंगापूर धरणातून ७,३७२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. शहरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी आज दुपारनंतर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. उजनी धरणातून १ लाख ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर वीर धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे नदीला महापूर आला आहे. यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी आणि संत पेठेतील काही भागांत पाणी शिरल्याने प्रशासनाने १०० कुटुंबांना स्थलांतरित केले आहे.

पुण्यात एकता नगर अद्याप पाण्यात

पुणे शहरात खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणे (खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर) पूर्ण भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून ३९,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. पुण्यातल्या एकता नगरमधील चार इमारतींच्या पार्किंगमध्ये काल पाणी शिरले होते. अद्यापही त्या ठिकाणी पाणी तसेच असल्याने परिस्थिती जैसे थै आहे. धरण साखळीत सध्या ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पालघरमध्ये वैतरणा नदीचा पूर ओसरल्याने मनोर-पालघर दरम्यानची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. बुधवारच्या दुपारी एक वाजल्यापासून १० तास वाहतूक ठप्प झाली होती, ती आता सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच सध्या मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.