अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशातच त्यांची मुलगी पोर्णिमा पंडितने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. तेजस्विनीनेही तिच्या अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. लहानपणी आईचा हवा तेवढा सहवास मिळाला नाही, परंतु कलाकार म्हणून त्यांनी काय कमावलं, याची जाणीव होईंपर्यंतचा हा प्रवास तिने शब्दांत मांडला आहे.
पोर्णिमा पंडितची पोस्ट-‘मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई).. मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही. तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही, म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दीवाले आणि नाटक, सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो, असं माझी आज्जी म्हणायची.
तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही. पण आई आता गेली. अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला.
माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच. पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण. अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आज्जीला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पूर्णा आज्जी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली, असा कलाकार होणे नाही, अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं, किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली.
View this post on Instagram
A post shared by Poornima(Pour-knee-maa) Pullan (@lilmissscute)
आता पटतंय, कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित.. एक रंगकर्मी, कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली, रूबाबात राहिली, माणसं जोडली, नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबीयांचे, मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्योती चांदेकर यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेनं झाली होती. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘एक नजर’ या चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी त्या वडिलांसोबत गेल्या होत्या. दिग्दर्शकाने दिलेल्या काही ओळी सहजगत्या वाचल्यानंतर ‘या मुलीला मेकअप करण्यासाठी न्या’ असं दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांमध्येही काम केलंय.