कामोठे कॉलनी फोरमचा पालिकेविरोधात संतापजनक निषेध
esakal August 21, 2025 04:45 PM

कागदी होड्यांतून निकृष्ट कामांची पोलखोल
कामोठेत कॉलनी फोरमचे महापालिकेविरोधात आंदोलन
पनवेल, ता. २० (बातमीदार)ः कामोठे शहरातील वाढत्या समस्यांचा कामोठे कॉलनी फोरमने भरपावसात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या वेळी पोलिस स्टेशन चौकातील रस्त्याची दुरवस्था, सेक्टर ३६ मधील पदपथांवरील अतिक्रमण तसेच शहरभर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे कागदी होड्या पाण्यात सोडत पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
कामोठे शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यापूर्वी केली गेलेली नालेसफाई कागदोपत्री असल्याने शहरभर पाणी साचले आहे. पालिकेचा हा कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असल्याने कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक आंदोलनातून पालिकेचा निषेध नोंदवला. या वेळी फोरमच्या महिला अध्यक्षा जयश्री झा यांनी पदपथावरील अतिक्रमणामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पालिकेने तातडीने अतिक्रमण दूर करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
-------------------------------------
जनतेच्या पैशांची उधळपट्टी
कामोठे कॉलनी फोरमच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. तसेच गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी तसेच तातडीची नालेसफाई करण्यात आली नाहीतर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असून, निकृष्ट दर्जाचे काम करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी पालिका दबाव आणते; पण मूलभूत सोयीसाठी खर्च करण्याऐवजी वाया घालवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
------------------------------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.