मुरबाड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा
टोकावडे, ता. २० (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात मुसळधार पावसाचा दोन कुटुंबांना फटका बसला आहे. दहीगाव-शेलारी येथील काशिनाथ लक्ष्मण माळी यांच्या राहत्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. उमरोली (खुर्द) येथील रघुनाथ लक्ष्मण सुरोशे यांच्या घराची पडवी पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनांची माहिती मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली. तसेच पंचनामा करून शासनाकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घोरले पुलावरील वाहतूक बंद
मुरबाड, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील घोरले गावाजवळून वाहणाऱ्या मुरबाडी नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या गावातून दूध, भाजीपाला मुरबाड शहरासाठी पुरवला जातो. त्यामुळे मुरबाड येथे येण्यासाठी बेलपाडा मार्गाने कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.
.....................