पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात चाललात, जखम असेल ७२ तासात प्रतिबंधात्मक औषधोपचार करा.. अन्यथा
Tv9 Marathi August 21, 2025 04:45 PM

मुंबईत गेले काही दिवस अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यादरम्यान ज्या व्यक्ती संथगतीने निचरा होत असलेल्या पाण्यातून चालल्या आहेत, अशा व्यक्तींना लेप्टोचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता असते. तर ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी काय काळजी घ्यावी याविषयी महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याने लोकांना काळजी आणि उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला जनजागृतीसह आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. लेप्टोस्पायरिसिस बाबत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य विभागाद्वारे कळविण्यात आले आहे की, पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे.

खरचटलेले जरी असेल, तरी

याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे की, अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल, तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.

एक गंभीर आजार

‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने आणि रुग्णालये येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी-मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आणि मित्रमंडळींना देखील याबाबत माहिती द्यावी.

गमबुटाचा वापर करावा…

त्याचबरोबर पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधासाठी पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.