Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू
esakal August 22, 2025 12:45 AM

गडचिरोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भामरागड तालुक्यात एका मुख्याध्यापकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. वसंत सोमा तलांडे (वय ४२) रा. जोनावाही, ता. भामरागड), असे मृताचे नाव आहे. ते अहेरी तालुक्यातील पल्ले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते.

वसंत तलांडे मुख्याध्यापक असलेले पल्ले हे गाव अहेरी तालुक्यातील पेरमिलीवरुन १० किलोमीटर अंतरावर आहे. वसंत तलांडे यांनी पत्नीला फोन करून पेरमिलीवरून गावाकडे येण्यास निघालो, अशी माहिती दिली.

परंतु ते गावी पोहोचलेच नाही. मंगळवार (ता. १९) भामरागड तालुक्यातील सिपनपल्ली नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती तेथील कोतवाल दिनेश मडावी यांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर मन्नेराजाराम महसूल मंडळातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली असता जोनावाही येथील वसंत तलांडे हे बेपत्ता असल्याचे कळले. नातेवाइकांनी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. तलांडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

त्यांच्या मृत्यूमुळे जोनावाही व पल्ले गावावर शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांत भामरागड तालुक्यात पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार (ता.१८) भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाय लकडा (वय १९) हा तरुण खंडी नाला ओलांडताना पुरात वाहून गेला.

Forest Department: वनविभागाला गवत बिया विक्रीतून दहा लाखांचा नफा; अनेक राज्यांतून मागणी, मुरडा उपवन क्षेत्रात गवत बी संकलन प्रकल्प

त्यानंतर वसंत तलांडे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भामरागडमधील पूर ओसरत आहे. मात्र, तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी फुगली आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यात पुराचा धोका वाढला असून तेथे बचाव पथक तैनात ठेवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी नीलेश तेलतुंबडे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.