आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळातील निवडणूका लढवण्याचे संकेत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. तब्बल 50 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नेमकी कोणत्या मुद्दावर झाली, हे स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखान्याच्या वादावरही बोलताना राज ठाकरे हे दिसले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात, असे राज ठाकरेंनी म्हटले.
कोर्टाने कबुतरखानेबंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला. हेच नाही तर दादर कबुरतखाना परिसरात जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी महापालिकेने लावली ताडपत्री फाटून टाकत कबुतरांना धान्य टाकले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली आणि दादर परिसरात तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर मराठी एकीकरण समितीही आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
जैन मुनींना याप्रकरणात काही धक्कादायक विधाने केली. त्यावेळी मनसेकडून कबुतरखाना प्रश्नावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही. आता राज ठाकरे यांनी कबुरतखाना वादावर थेट भाष्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.