अहिल्यानगर जिल्हातील लमाणतांड्यांना विकासनिधीची प्रतीक्षा; वीस तांड्यांना दोन कोटींचा निधी मंजूर होऊनही कामांना मिळेना मुहूर्त
esakal August 22, 2025 01:45 AM

पाथर्डी : संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेतून जिल्ह्यातील वीस लमाण तांड्यांना मंजूर झालेला दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी  अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे हे तांडे विकासापासून वंचित राहिले आहेत. मंजूर झालेला निधी नेमका कधी मिळणार, याकडे वीस तांड्यांवरील  लमाण समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. हा निधी लवकर मिळावा, अशी मागणी होत आहे.

MLA Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार:आमदार अमोल मिटकरी; 'स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत माेठ विधान'

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६७ लमाणतांडे असून, या तांड्यांवर भौतिक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे अशासकीय सदस्य विष्णुपंत पवार यांनी मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एक पत्रान्वये केली होती. या पत्राची दखल घेत महाजन यांनी ऑक्टबर २४ मध्ये जिह्यातील ६७ पैकी वीस लमाण तांड्यांना दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला. ९ ऑक्टोबर २०२४ ला या कामाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली.

या निधीतून लमाणतांड्यांवर स्मशानभूमी, सुशोभीकरण, सभागृह अशी कामे करण्यात येणार होती. ज्या वीस तांड्यांना हा निधी मंजूर करण्यात आला, त्यातील अहिल्यानगर तालुक्यातील  खांडके ग्रामपंचायतीअंतर्गत पवार व चव्हाण तांडा, शेवगाव तालुक्यातील दिवटे ग्रामपंचायतीअंतर्गत असलेले रामनगर व लक्ष्मीवाडी तांडा, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या पठारवाडी व पवार मळा तांडा, तर पाथर्डी तालुक्यातील कुरणतांडा, वसंतराव नाईक नगर, सेवागड तांडा, घुमटवाडी तांडा, भवानीनगर तांडा, काकडदरा तांडा, आंबेवाडी तांडा, सेवानगर तांडा, भगवानगड तांडा, कोकिसपीर तांडा, दुर्गानगर तांडा, हनुमान नगर व सुरसवाडी या तांड्यांचा समावेश आहे.

मागील वर्षी प्रशासकीय मान्यता मिळूनही निधी मात्र प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या कामाचा कार्यारंभ आदेश अजूनही न काढल्याने हा निधी नेमका कधी मिळणार व तांड्यांचा विकास कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मंजूर झालेला निधी तत्काळ मिळावा, अशी मागणी लमाण समाजातून होत आहे  अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या या तांड्यांना निधी नेमका कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

लमाणतांड्यांना विकासासाठी निधी मिळावा, म्हणून आम्ही ग्रामविकास विभागाच्या संपर्कात असून, येत्या पंधरा दिवसांत हा निधी मिळणे अपेक्षित आहे.

- विष्णुपंत पवार, सामाजिक कार्यकर्ते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.